section and everything up until
* * @package Newsup */?> लातूर जिल्ह्यात 9 फेब्रुवारीपासून ‘जागरूक पालक, सदृढ बालक अभियान’ | Ntv News Marathi

▪️ शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मुला-मुलींची होणार आरोग्य तपासणी
▪️ जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला आढावा

लातूर, दि. 07 :
जिल्ह्यात 9 फेब्रुवारी 2023 पासून ‘जागरूक पालक, सदृढ बालक’ अभियान राबिण्यात येणार आहे. या अंतर्गत शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालके, किशोरवयीन मुला-मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांच्यासह सर्व संबंधित विभागप्रमुख तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.

शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांची, किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भसेवा देवून उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे, सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे हा ‘जागरूक पालक, सदृढ बालक’ अभियानाचा उद्देश आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, अंगणवाड्या, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथालये, समाज कल्याण व आदिवासी विभागाची मुला-मुलींची वसतिगृहे, खाजगी नर्सरी, बालवाड्या, खाजगी शाळा व खाजगी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुला-मुलींची तपासणी करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील एकूण 6 लाख 74 हजार 637 मुले-मुली असून हे अभियान 9 फेब्रुवारी 2023 पासून जिल्ह्यात राबविले जाणार आहे.

एकही बालक आरोग्य तपासणीपासून वंचित राहू नये : जिल्हाधिकारी

‘जागरूक पालक, सदृढ बालक’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालके, किशोरवयीन मुला-मुलींची आरोग्य तपासणी व्हावी. एकही बालक यापासून वंचित राहू नये. तसेच त्यांच्यामध्ये आढळणारे आजारांची, लक्षणांची व्यवस्थित नोंदी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी दिल्या. तसेच या अभियानाचा दर पंधरा दिवसांनी जिल्हास्तरावर आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल

जिल्ह्यात ‘जागरूक पालक, सदृढ बालक’ अभियानामध्ये प्रत्येक बालकाची काळजीपूर्वक आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी समन्वयाने काम करावे. तसेच आरोग्य तपासणीनंतर प्रत्येक बालकाच्या आरोग्याबाबत स्वतंत्र नोंद घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या.

प्रतिनिधी मोमीन हारून
एन टीव्ही न्युज मराठी
लातूर
9822699888 / 9850347529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *