पुणे : शिरूर तालुक्यातील अण्णापूर,टाकळी हाजी ,बेट परिसरातील कृषीपंप,केबलची चोरी करणा-या टोळीला शिरूर पोलीसांनी जेरबंद केले आहे. वैभव सुरेश पाराटे वय -२३ वर्षे, गौरव रामचंद्र पाराटे वय -१९ वर्षे, सुरेश मारूती पाराटे वय -६० वर्षे सर्वजण रा.टेमकरवस्ती ,टाकळी हाजी ता.शिरूर जि.पुणे ,रज्जाक दाऊद शेख,भंगार व्यावसायिक, वय -५९ वर्षे रा.हल्दी मोहल्ला शिरूर अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १२ कृषीपंप व केबल असा एकूण १ लाख ३८ हजार १०० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
शिरूर पोलीसांनी याबाबत दिलेल्या माहितीनूसार, शिरूर, अण्णापूर,टाकळी हाजी, बेट भागामध्ये लागोपाठ कृषीपंप व केबल चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतक-यांना शेतीपिकांना पाणी देण्यासाठी कृषीपंप व केबल आवश्यक गोष्ट असल्याने त्याच गोष्टींची चोरी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्याबाबत समाजमाध्यमातून पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असल्याने पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीसांचे वेगवेगळे पथक तयार करून सतत त्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये सातत्य ठेवून पोलीस पथकाच्या मार्फत गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढून कृषीपंप व केबल चोरी करणारी टोळी तसेच चोरीची केबल व कृषीप़ंप घेणारा अशी जेरबंद केली आहेत. शेतक-यांनी त्यांच्या नदीकिनारी असणा-या कृषीपंपाचे संरक्षण करण्यासाठी गट तयार करून त्याठिकाणी रात्रीच्या वेळी आळीपाळीने गस्त करावी त्यांना पोलीस मदत देण्यात येईल असे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी शेतक-यांना केले आहे.पोलीस अधिक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस सब इन्स्पेक्टर सुनिल उगले, पोलीस सब इन्स्पेक्टर एकनाथ पाटील, सहाय्यक फौजदार माणिक मांडगे, पोलीस नाईक धनंजय थेऊरकर ,विनोद मोरे, पोलीस काॅन्स्टेबल रघुनाथ हाळनोर, सुरेश नागलोत, विशाल पालवे, दिपक पवार,विष्णू दहिफळे या टीमने ही कार्यवाही,कामगिरी केली.
