(सचिन बिद्री:धाराशिव)
विधान परिषद उपसभापती मा.निल्हमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली दि 30 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे “भुकंपाला ३० वर्षे” आणि सद्यस्थिती याबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी औसा मतदार संघांचे आमदार अभिमन्यू पवार, उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले, लातूरच्या जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
३० जानेवारी १९९३ रोजी किल्लारी येथे झालेल्या भूकंपात उमरगा, लोहारा व औसा तालुक्यातील अनेक गावे बेचिराख होऊन हजारो निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अद्यापही भूकंपग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे शासनस्तरावरून भुकंपग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी यावेळी आमदार चौगुले यांच्या वतीने करण्यात आली.,तसेच काही मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.
प्रमुख मागण्या
१) १७ नोव्हेंबर १९९४ ते आजतागायतच्या भूकंपग्रस्तांच्या आरक्षणाचा अनुशेष जाहीर करून तो त्वरित भरून काढावा.
२) दि.०७/०७/२०१४ रोजी तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीत, धाराशिव व लातूर जिल्ह्यातील भूकंप पुनर्वसन प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या (भूकंप प्रकल्पग्रस्त, भूकंप पिडीत) त्या शेतकऱ्यांना २५०० चौरस फुट आकाराचे भूखंड वाटप करण्याचे शासनाने मान्य केले होते. त्याची तात्त्काळ अंमलबजावणी व्हावी.
३) लातूर व धाराशिव जिल्ह्यातील सर्व भूकंपग्रस्त गावांतील वाढीव कुटुंबांना गावातील संपादित शिल्लक क्षेत्रावर घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात याव्या
४) भुकंपात महिलांच्या नावे वाटप केलेली घरे महिलांच्या नावे नियमित करून त्यांच्या वारसास भुकंपग्रस्त प्रमाणपत्रे देण्यात यावे.
५) लातूर व धाराशिव जिल्हातील भूकंपग्रस्त भागात विनाअनुदानित कार्यरत असणाऱ्या प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना आदिवासी विभागाप्रमाणे भूकंपग्रस्त म्हणून १०० % अनुदान देण्यात यावे.
६) भूकंपग्रस्त कुटुंबांना देण्यात आलेली घरे व खुले भूखंड यांचे खरेदी-विक्री अधिकार संबंधित ग्रामपंचायत स्तरावर होण्यासाठी परवानगी देण्यात यावी, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील बावन्न गावांमध्ये अंतर्गत रस्ते व गटारी करण्यासाठी विशेष पेकेजची घोषणा करावी.
७) सास्तूर ता.लोहारा येथील स्मृतीस्थळावर भूकंप स्मृतीदिन शासकीय स्तरावर साजरा व्हावा.