धाराशिव : भारताला ज्ञान महासत्ता बनवण्यासाठी आणि कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाबरोबर मल्टिपल एन्ट्री – मल्टिपल एक्झिटचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सर्वच विद्यापीठांमध्ये समान अभ्यासक्रम लागू केल्यास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी होईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी केले.उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी “विद्यापीठ नामविस्ताराची तीन दशके आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” या एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रासाठी उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्राचार्य घनश्याम जाधव मार्गदर्शन करत होते. यावेळी बोलताना त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम तयार करण्याबरोबरच त्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही विचार व्हावा लागेल असे मत व्यक्त केले.
या चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात डॉ. वसंत हिस्सल यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचे स्वरूप व रचना याविषयी माहिती उपस्थितांना दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदल अपेक्षित आहेत तसेच चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आणि बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धती याबद्दल मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात डॉ. प्रवीण माने यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील निर्माण झालेल्या आव्हानांवर भाष्य केले. २०४७ पर्यंत भारताला विकसित होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे निश्चितच उपयुक्त पडेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मूल्यमापन पद्धतीबद्दलची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. या सर्व प्रक्रियेत प्रत्येक महाविद्यालयात एनईपी सेल तयार करावा अशी सूचनाही त्यांनी केली.
तिसऱ्या सत्रात सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी खुली चर्चा केली,या चर्चेत अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त असेल आणि कुशल मनुष्यबळ कसे उपलब्ध होईल याविषयी प्रश्न उपस्थित केले. उपस्थित प्राध्यापकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यामध्ये असणारी विसंगती तसेच शिक्षणक्षेत्र हे खाजगीकरणाकडे जाणारे आहे किंवा बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाचा विचार करताना विषय निवडी बद्दलचे प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असल्यामुळे महाविद्यालयात वेळापत्रक तयार करताना अडचणी निर्माण होतील काय याविषयी या चर्चासत्रात विचार मंथन करण्यात आले. या चर्चासत्रासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .विलास इंगळे, अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. सुभाष इंगळे, डॉ. ज्ञानोबा ढोबळे, डॉ .संदिपान सावंत, डॉ. सूर्यकांत रेवते, प्रभारी प्राध्यापक डॉ विनोद देवरकर, प्रा.जी. एस. मोरे, प्रा. शैलेश महामुनी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्राचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गिरीधर सोमवंशी यांनी केले तर उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
(सचिन बिद्री)