दौंड तालुक्यातील मलठन, राजेगाव, नायगाव, वाटलुज हद्दीतील वनक्षेत्रात अवैध वृक्ष तोड, माती उत्खननबाबत राजकीय दबावाखाली दिशाभूल करणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करून तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांचा राजकीय बळी गेल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
दौंड तालुक्यातील मलठन, राजेगाव, नायगाव, वाटलुज येथील वनक्षेत्रातील वृक्षतोड प्रकरणी मलठन ग्रामपंचायतकडून ११ जानेवारी रोजी तालुका वन कार्यालयात पत्राव्दारे तक्रार करण्यात आली होती. तालुका वन अधिकारी यांनी तात्काळ प्रकरणाची दखल घेऊन त्याच दिवशी दौंडचे वनपाल यांना संबंधित घटनास्थळी चौकशी करून कार्यवाहीचे निर्देश देत वनपाल व वनरंक्षक यांनी बेकायदेशीर वृक्ष तोडीबाबत खुलासा करावा असे आदेश देण्यात आले होते. १३ व १६ जानेवारी रोजी मलठन, राजेगाव, नायगाव, वाटलुज येथील वनक्षेत्रातील वृक्षतोड प्रकरणी तालुका वनकार्यालयात वनगुन्हे दाखल करून तात्काळ सदरचे वनगुन्हे १८ जानेवारीला मंजुरीसाठी वरीष्ठ कार्यालयात सादर केले होते.
तसेच १५ ते २६ जानेवारी पर्यंत कल्याणी गोडसे यांच्या निर्देशाने मौजे मलठन, राजेगाव, नायगाव, वाटलुज वृक्षतोड व अवैध कोळसा भट्यावर धडक कारवाई करण्यात आली होती. पुणे येथे वनरक्षक भारती प्रक्रियेत कल्याणी गोडसे या कर्तव्यावर असल्याचा फायदा घेत आरोपींनी वन विभागातील नायगाव हद्दीतील वनक्षेत्रात नव्याने वृक्षतोड केली जात असल्याची माहिती प्राप्त होताच ५ फेब्रुवारी रोजी कल्याणी गोडसे यांनी धडक कारवाई करत दंडुकाचा प्रसाद देऊन आरोपीस ताब्यात घेतले होते. परंतु आरोपीच्या नातलागतील चार महिलांनी गोडसे यांच्याशी हुज्जत घालून आरोपीस पळून जाण्यास मदत केली होती अशी माहिती समोर येत आहे.
साहायक वनसंरक्षक दीपक पवार यांनी मलठन ग्रामपंचायतच्या तक्रारीच्या अनुषंगाने ६ व ७ फेब्रुवारीला स्थळ पाहणी करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर केला. दौंड तालुक्यातील भूमिपुत्र असलेले मर्जीतील वनपरिक्षेत्र अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी कल्याणी गोडसे यांच्या विरोधात राजकीय दबावापोटी दिशाभूल करणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करून निलंबित आदेश जारी केला असल्याचे आरोप नागरिक करत आहेत. वनक्षेत्रातील वृक्षतोड बाबत मलठण ग्रामपंचायतने दिलेल्या तक्रारी पासून ०५ फेब्रुवारी पर्यंत वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी कोणतेही कार्यवाही केली नसल्याचा कारण पुढे करत वनसंरक्षणात हयगय केला असल्याचा चुकीचा ठपका निलंबित आदेशात ठेवला असल्याची चर्चा रंगली आहे.
मलठण ग्रामस्थांनी दौंडचे वनपाल व वनरक्षक यांच्या कर्तव्य दक्षतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करून संगनमताने वृक्ष तोड केली जात आहे असा आरोप पत्राव्दारे केला होता. तसेच वनक्षेत्रातील वृक्षतोडीचे निवेदन प्राप्त झाले नंतर कल्याणी गोडसे यांनी १३ व १६ जानेवारी रोजी वनगुन्हे दाखल केले होते. सदरचे दाखल वनगुन्हे सहायक वनसंरक्षक यांच्या मंजुरीसाठी त्यांच्या टेबलवर १८ जानेवारीला सादर करण्यात आले होते.
वृक्षतोड प्रकरणी दोषी ठरवत दौंडचे वनपाल व राजेगावचे वनरक्षक यांचे निलंबन झाले. तालुक्यातील राजकीय नेत्याला आपल्या वनक्षेत्रातील अवैध कृत्यास कायम विरोध करत असलेल्या कल्याणी गोडसे यांचे निलंबन करण्याची नामी संधी असल्याचे हेरून आपल्या मर्जीतील तालुक्याचा भूमिपुत्र असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी वन मंत्रालयातून दबाव आणला व वरिष्ठ वन अधिकारी यांनी दबावापोटी कल्याणी गोडसे यांनी केलेल्या कारवाईची दखल न घेता, त्यांच्या रजेवर व कर्तव्यावर अनुपस्थित असताना झालेल्या तोडीला पण त्यांनाच जबाबदार धरून वनरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या वनसंरक्षणाची जबाबदारीचा विचार न करता तसेच सरसकट कारवाई केल्याने गव्हा सोबत किडे सुद्धा रगडले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
एका महिला अधिकाऱ्यांवर कट कारस्थान करून केलेल्या अन्यायी निलंबनाची चर्चा नागरिकांमध्ये चालू झाली असून कल्याणी गोडसे वरील अन्यायकारक निलंबन रद्द होणेची मागणी तालुक्यातील बुद्धीजीवी लोकांकडून होत आहे.
Box
१३ व १६ जानेवारी रोजी वनगुन्हे दाखल केल्याची माहिती अहवालात नमूद करण्यात आली होती. तसेच ६ फेब्रुवारीला घटनास्थळी चौकशी कामी येणार असल्याची माहिती मिळताच ५ फेब्रुवारीला वनगुन्हा दाखल करून काहीच कार्यवाही झाली नाही.
दिपक पवार (सहायक वनसंरक्षक, पुणे)