०६-अकोला व १४-यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागु
वाशिम – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात सर्वत्र लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषीत केला असून त्यानुसार ०६-अकोला व १४-यवतमाळ वाशिम मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागु झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी आज, शनिवार, १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सायंकाळी ५ वाजता आयोजीत पत्रपरिषदेत माहीती दिली. या निवडणूकीमध्ये सर्व मतदारांसोबतच विशेषकरुन महिला मतदारांचा टक्क वाढविण्यावर जिल्हा निवडणूक विभागाचा व जिल्हा प्रशासनाचा भर राहणार असून ‘आम्ही आहोत महिला मतदार ! मतदानाचा हक्क अवश्य बजावणार !’ हा या निवडणूकीचा स्लोगन राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पत्रपरीषदेला सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा माहिती अधिकारी पवनकुमार राठोड आदी उपस्थित होते.
अधिक माहिती देतांना त्यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या विविध प्रक्रियेची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, १६ मार्च रोजी निवडणूकीची घोषणा झाली असून २८ मार्च रोजी त्याची अधिसुचना निघेल. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल असेल. नामनिर्देशन पत्राच्या छाननीची तारीख ५ एप्रिल, उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल अशी असेल. तर २६ एप्रिलला मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. ४ जून रोजी मतमोजणी होईल तर ६ जूनला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया पुर्ण होईल. त्याअनुषंगाने ०६-अकोला मतदार संघामधील ३३-रिसोड मतदार संघासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला तसेच १४-यवतमाळ वाशिम मतदार संघातील ३४-वाशिम (अजा) संघ व ३५- कारंजा मतदार संघासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे नामनिर्देशन पत्रे स्विकारल्या जातील. ०६-अकोला मतदार संघातील ३३-रिसोड विधानसभा मतदार संघामध्ये १६५४२४ पुरुष मतदार, १४९७९४ स्त्री मतदार व ० तृतीयपंथी असे एकूण ३१५२१८ मतदार आहेत. तर १४- यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील ३४-वाशिम (अजा) विधानसभा मतदार संघात १८५५०५ पुरुष मतदार, १६९५९२ स्त्री मतदार व ८ तृतीयपंथी असे एकूण ३५५१०५ मतदार आहेत. तर ३५-कारंजा विधानसभा मतदार संघात पुरुष १५८३७१, स्त्री १४७३३० व तृतीयपंथी ८ असे एकूण ३०५७०९ मतदार आहेत. दोन्ही मतदारसंघ मिळून एकूण पुरुष मतदार ५०९३००, एकूण स्त्री मतदार ४६६७१६, तृतीयपंथी मतदार १६ असे एकूण ९७६०३२ मतदार आहेत. मतदार संघनिहाय मतदार केंद्र संख्या पुढीलप्रमाणे आहे. ३३-रिसोड विधानसभा मतदार संघात मुळ मतदार केंद्र संख्या ३३७, ३४-वाशिम (अजा) विधानसभा मतदार संघात मुळ मतदान केंद्र संख्या ३८१, सहाय्यकारी मतदान केंद्र ५ असे एकूण ३८६ मतदान केंद्रे आहेत. तर ३५-कारंजा विधानसभा मतदार संघात मुळ मतदान केंद्र संख्या ३५३ असे एकूण मुळ मतदान केंद्र संख्या १०७१, सहाय्यकारी केंद्र ५ व एकूण मतदान केंद्र संख्या १०७६ अशी आहे. ३३-रिसोड मतदार संघात ४, ३४-वाशिम (अजा) मध्ये ४ व ३५-कारंजा मतदार संघात ५ अशी एकूण १३ चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे. निवडणूक व आचारसंहितेच्या अनुषंगाने येत्या २४ तासात विविध राजकीय पक्षाचे पोस्टर, बॅनर, स्टिकर आदी काढण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यासाठी संबंधीत अधिकार्यांची चमु कार्यान्वीत करण्यात आली आहे. मतदानाच्या ठिकाणी व्हिलचेअरची सोय करण्यात आली असून दिव्यांग व वयोवृध्दांसाठी घरुन मतदान करण्याची सोय राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिली.
माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती गठीत
माध्यमांना निवडणूकीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष व माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून या समितीमार्फत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होणार्या पेड न्युज तपासुन याबाबत कार्यवाही केली जाईल.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभाग व जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206