वडगाव प्रभागातील अभ्यासिकेचे भूमिपूजन संपन्न
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठे यश संपादन करणाऱ्या अंशुमन यादव यांचा सत्कार
चंद्रपूर (सतीश आकुलवार)
चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक विकास निधीतून २५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेल्या वडगाव प्रभागातील सार्वजनिक दत्त मंदिर नानाजी नगर येथील अभ्यासिकेचे दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ ला सकाळी ९ वाजता भूमिपूजन संपन्न झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत संपूर्ण देशातून २४२ व्या क्रमांकावर स्थान मिळविणाऱ्या चंद्रपूरच्या अंशुमन अमरनाथ यादव तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून गडचिरोली येथे उपशिक्षणाधिकारी पदावर रूजू झालेले स्नेहल अशोक काटकर यांच्या उपस्थितीमध्ये अभ्यासिकेचे भूमिपूजन करून वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या संकल्पनेतील श्री दत्त क्रीडा व सांस्कृतिक केंद्राची कोनशिला ठेवण्यात आली.या केंद्रामध्ये अभ्यासिका,व्यायामशाळा,क्रीडांगण, नवीन पूल, पथदिवे,रस्ते इत्यादी सर्व सुविधांचा समावेश राहणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार,प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच वडगाव प्रभागाचे नगरसेवक देवानंद वाढई, नगरसेविका सुनिता लोढीया, वेकोलिचे पराशियाचे उपमहाप्रबंधक अमरनाथ यादव,श्री शंकर क्रीडा व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष स्केटिंग कोच विनोद निखाडे, प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक मनोज भैसारे सर तसेच घनश्याम येरगुडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार यांनी संपूर्ण चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये ११ अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प असल्याचे जाहीर केले.तसेच विधानसभा क्षेत्रातील कोणताही सर्वसामान्य विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे किंवा सुविधांच्या अभावी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची ग्वाही सुद्धा दिली. अभ्यासिके मध्ये पुस्तक खरेदी करीत १० लक्ष रुपयांचा निधी देण्याची घोषणा सुद्धा आमदार जोरगेवार यांनी यावेळी केली. दिल्ली येथे परिक्षाधीन उपजिल्हाधिकारी अंशुमन यादव तसेच गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी स्नेहल काटकर यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना अंशुमन यादव यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात उत्तम अभ्यासिका एक महत्वपूर्ण घटक असल्याचे नमूद केले.तसेच वडगाव प्रभागातील अभ्यासिकेतून भविष्यात देश व राज्याची सेवा करणारे विद्यार्थी घडतील असा विश्वास सुद्धा व्यक्त केला.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे नमूद केले. चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुल येथील ज्येष्ठ व्हॉलिबॉल संघाने मोरवा येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधल्या बद्दल अध्यक्ष प्रदिप जानवे त्यांचे सर्व सहकारी यांचा सुध्दा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक पप्पू देशमुख , सूत्रसंचालन राहुल दडमल व आभार प्रदर्शन मनोज भैसारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अक्षय येरगुडे,आकाश लोडे,मनीषा बोबडे,गितेश शेंडे,कार्तिक दुरडकर,आशिष वलादे,प्रकाश घुमे,नंदू पाहुणे,निलेश पाझारे इत्यादींनी अथक प्रयत्न केले. यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते.