तात्काळ काम सुरु न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांचा आंदोलनाचा इशारा..
नगर (प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग क्र. 15 मधील आयुर्वेद कोपऱ्यापासून काटवन खंडोबा मंदिर, आगरकर मळा परिसरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व पुल बांधण्याच्या कामास महानगरपालिकेने प्रशासकीय मान्यता दिली असून, जिल्हास्तरीय समितीच्या 15 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत अट क्रमांक 5 नुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण असल्यास ते हटवण्यात यावे अशी अट घालण्यात आली होती.
सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी सदर रस्त्याचे काम न सुरू केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ई-ऑफीस क्र. 5264128 अन्वये काम नगरपालिका शाखेकडे पाठविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात काम सुरू करण्यात आलेली नाही.
महानगरपालिका शहर अभियंता यांनी 15 मे 2025 रोजी पत्र देत सांगितले की, विकास योजनेनुसार 15 मीटर रस्त्याच्या मोजणीच्या खुणा देण्याचे काम नगररचना विभागाकडून प्रलंबित आहे. खुणा मिळाल्यानंतर 30 दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही बांधकाम विभागाने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात ठेकेदार अभिजीत अशोक काळे यांनी तीन महिन्यांपासून रस्ता खणून तसेच ठेवला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून, ड्रेनेज लाईन जेसीबीने तोडण्यात आल्याने रस्त्यावरून घाण पाणी वाहत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात दोन कब्रस्तान, एक स्मशानभूमी आणि काटवन खंडोबा मंदिर, संजयनगर झोपडपट्टी व घकुलचा समावेश असलेल्या मोठ्या लोकवस्तीचा समावेश असून नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे.
सप्तपदी मंगल कार्यालयापर्यंत काँक्रीटीकरणाची तरतूद असताना, सिना नदी पुलापर्यंत मात्र डांबरीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. जेथे पावसामुळे वारंवार रस्ता खराब होतो, अशा ठिकाणी काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरण केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
याशिवाय, जंगे शहीदा कब्रस्तान परिसरात साइड गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून अनेक ठिकाणी भिंती तुटल्या आहेत. नगररचना विभागाकडून खुणा मिळालेल्या नसताना ठेकेदाराने परस्पर रस्ता खणला असून, यामागे कोणाचा आदेश होता याचा खुलासा झालेला नाही.
महानगरपालिका आयुक्त डांगे यांनी संबंधित ठेकेदाराला कोणताही जाब विचारलेला नाही. उलट, 150 कोटींच्या निविदा दरात काम मंजूर करताना इतर ठेकेदारांना प्रमाण दर दिला गेला, पण या ठेकेदाराला 10 टक्के जास्त दर मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे मनपाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडला असून, फेरनिविदा न काढता जादा दर मंजूर करण्याचा निर्णय संशयास्पद असल्याचे शेख यांनी म्हंटले आहे.
या सर्व प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, 8 जूनपर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास 9 जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच आयुक्त डांगे यांच्यावर चौकशी करून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.