• नगरपरिषद, जि. प., पं. स. निवडणुकीच्या तयारीसाठी हळगाव येथे तीन दिवस तळ..!

जामखेड: आगामी नगरपरिषद निवडणुकीमुळे ऐन थंडीच्या वातावरणात जामखेडचे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी जामखेड शहर व तालुक्यातील आगामी निवडणुकांचा सखोल आढावा घेण्यासाठी चक्क तालुक्यातील हळगाव येथे गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकला आहे. या मुक्कामादरम्यान त्यांनी नगरपरिषद, जिल्हा परिषद (जि. प.) आणि पंचायत समितीच्या (पं. स.) निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ‘मास्टर स्ट्रोक’ टाकण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. यामुळे परिषदांच्या निवडणुकीत भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ला देखील इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसत आहे.

पवारांचे जामखेडवर जातीने लक्ष

जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसह आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आमदार रोहित पवार यांनी जामखेडवर जातीने लक्ष केंद्रित केले आहे. शहरात नगराध्यक्ष आणि प्रत्येक प्रभागातून नगरसेवक कसे निवडून आणता येतील, याचा सखोल अभ्यास ते करत आहेत. यासाठी त्यांनी विशेष यंत्रणा कामाला लावली आहे. विधानसभा निवडणुकीत जामखेड शहरातून आमदार रोहित पवार यांना जवळपास तीन हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीतही तालुक्यात राष्ट्रवादीला पोषक वातावरण निर्माण होईल, या आशेवर कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

बंडखोरी टाळण्याचे आव्हान

नगरपरिषद निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षात बंडखोरी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांना आवर घालणे हे राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान असणार आहे. या अनुषंगाने, आमदार रोहित पवार यांनी आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली असून, निवडणुकीत नवे चेहरे समोर आणले जाण्याची शक्यता आहे. शहरात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) ची ताकद असून, आमदार रोहित पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे.

उमेदवारीचा सस्पेन्स कायम

इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित करण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. मात्र, उमेदवारी कधी जाहीर होणार याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. ऐनवेळी उमेदवारी जाहीर करून बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत साठहून अधिक नगरसेवक पदाच्या इच्छुकांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) ला प्राधान्य दिले आहे. हे सर्वसामान्य कार्यकर्ते असले तरी त्यांच्या माध्यमातून स्थानिक आघाड्या आणि नेत्यांच्या पॅनेलपुढे आव्हान निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. आमदार रोहित पवार यांनी शहरात ताकद लावल्यामुळे आगामी निवडणुकीत सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीला संघर्ष करावा लागणार आहे.

नंदु परदेशी (अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *