मोबाईल व्हॅनमुळे कर्करोगाचे वेळेत निदान होऊन उपचाराला संधी मिळेल : उपायुक्त विजयकुमार मुंडे

अहिल्यानगर – महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून कर्करोग निदान व्हॅन सेवा आपल्या शहरात सुरू झाली आहे. अहिल्यानगर शहराच्या महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेतील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लवकर निदान होईल व उपचाराची संधी वाढतील. अनेकवेळा कर्करोगाचे निदान अखेरच्या टप्प्यात होते. त्यामुळे उपचाराला संधी मिळत नाही. या या मोबाईल व्हॅनमुळे वेळेत निदान होईल व नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा महानगरपालिकेमार्फत उपलब्ध होईल, असा विश्वास उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासन संचलित कॅन्सर स्क्रिनींग मोबाईल व्हॅन मार्फत कॅन्सर स्क्रिनींग सेवेचा शुभारंभ मंगळवारी कै. गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या यांच्या हस्ते करण्यात आला. महानगरपालिकेच्या जिजामाता आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमास उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, माजी नगरसेवक मीना चोपडा, प्रकाश भागानगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतिश राजुरकर, प्रभाग अधिकारी शहाजान तडवी आदी उपस्थित होते.

उपायुक्त डॉ. मुंडे म्हणाले की, नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्य सेवा व सुविधा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून उपक्रम राबवले जात आहेत. कॅन्सर स्क्रिनींग मोबाईल व्हॅन हा त्याचाच भाग आहे. नागरिकांनी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या या सेवांचा लाभ घ्यावा, इतर आरोग्य विषयक योजनांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुरुवातीला कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप बागल यांनी राज्य शासनाच्या या उपक्रमाची माहिती दिली. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये कॅन्सर स्क्रिनींग मोबाईल व्हॅन कार्यरत आहे. आता आपल्या जिल्ह्यात व अहिल्यानगर शहरात ही सेवा सुरु करण्यात आली आहे. स्तन कर्करोग (क्लिनिकल ब्रेस्ट परीक्षा), तोंडाचा कर्करोग (दृश्य तपासणी, बायोप्सी), गर्भाशय मुखाचा कर्करोग (अॅसिटिक अॅसिडद्वारे दृश्य तपासणी (VIA), कोलपोस्कोपी मार्गदर्शित बायोप्सी) आदी तपासण्या या व्हॅनच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. या व्हॅनमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतचिकित्सक आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी कार्यरत असणार आहेत , असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, तपासणीमध्ये कर्करोगाची पुष्टी झालेल्या रुग्णांना मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये पुढील उपचारासाठी पाठवले जाते. यामध्ये शस्त्रक्रिया, कीमोथेरपी किंवा इतर आवश्यक उपचारांचा समावेश असतो. या सेवांचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी केले. शेवटी वैद्यकीय अधिकारी डॉ. आयेशा शेख यांनी आभार मानले.