ODISHA | ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अमानवीय प्रकार समोर आला आहे. धर्मकोट ब्लॉकमधील खारीगुमा गावात दोन दलित तरुणांवर क्रूर अत्याचार करण्यात आला. गावकऱ्यांनी ‘कंगारू कोर्ट’ लावून या दोन तरुणांना अर्धनग्न करून, बेदम मारहाण केली, गावात फरफटत नेलं आणि जबरदस्तीने घाण पाणी पाजलं.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिपूर गावातील दोन दलित तरुण तीन गायी घेऊन सिंगीपूर गावात जात होते. या गायी एका मुलीच्या लग्नात हुंड्यासाठी नेत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, खारीगुमा गावाजवळ काही लोकांनी त्यांना थांबवलं आणि गो-तस्करीचा आरोप करत त्यांच्याकडून पैसे मागितले.

गरीब तरुणांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर जमावाने त्यांच्या कपड्यांचं वस्त्रहरण केलं आणि अमानुष मारहाण केली. इतक्यावरच न थांबता, दोघांना दोरीने बांधून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर खारीगुमा ते जहाड़ा गावापर्यंत मुख्य रस्त्यावर फरफटत नेण्यात आलं. या दरम्यान त्यांना जबरदस्तीने गवत खायला लावलं आणि नाल्याचं घाण पाणी पाजण्यात आलं. संपूर्ण प्रकार गावकऱ्यांच्या समोर घडला, मात्र कोणत्याही व्यक्तीने मदत करण्याचे धाडस दाखवले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *