धाराशिव: उमरगा तालुक्यातील कोराळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे छत कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या जीर्ण झालेल्या इमारतीसह भूकंपग्रस्त भागातील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
१ ऑगस्ट रोजी पहाटे कोराळ येथील जिल्हा परिषद शाळेचा सुमारे २०x१० फुटांचा स्लॅब कोसळला. सुदैवाने, ही घटना शाळा बंद असताना घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शाळेचे पुढील कॉलम विटेने बांधण्यात आल्याने संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रा. बिराजदार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९९७ साली भूकंपानंतर विविध संस्था आणि शासनामार्फत बांधण्यात आलेल्या या इमारतींना आता ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांची स्थिती अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी या सर्व इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे.
याशिवाय, कोराळ शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. भूकंपग्रस्त भागातील इमारती आणि खराब रस्त्यांची सद्यस्थिती शासनाकडे पाठवून त्यासाठी निधीची तरतूद करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
प्रतिनिधी सचिन बिद्री
एनटीव्ही न्यूज मराठी – धाराशीव.