पाथर्डी/अहिल्यानगर (प्रतिनिधी):
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांवरील अनेक बंधारे फुटले असून त्यांचे मातीचे भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहेत. भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी, शासनाने मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून वाहून गेलेले बंधारे तातडीने बुजवण्याचे (दुरुस्तीचे) काम हाती घेतले आहे. तालुक्यात आतापर्यंत २० बंधारे मातीच्या भराव्याने बुजवण्यात आले आहेत.
पाणी टंचाईच्या भीतीमुळे कामाला गती
अतिवृष्टीमुळे बंधारे फुटल्याने साठून राहणारे पाणी खाली वाहून जात होते, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने हे बंधारे दुरुस्त करण्याची मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले आणि आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडे केली होती.
या मागणीची दखल घेत, लोकप्रतिनिधींनी यांत्रिकी विभागाला सूचना केल्या आणि जलसंपदा व मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून दुरुस्तीचे युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले.
करंजी गावासह तालुक्यातील अनेक नदीवरील बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. करंजी येथील बंधारे बुजवण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली होती, त्यानुसार करंजी येथील बंधारे बुजवण्याचे काम सुरू असल्याचे सरपंच नसीम शेख यांनी सांगितले.
उपअभियंत्यांची माहिती
उपअभियंता (मृद व जलसंधारण) पी. एम. दहातोंडे यांनी या कामाची माहिती देताना सांगितले की,
“पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक बंधाऱ्यांचे मातीचे भराव पुराच्या पाण्याने वाहून गेले होते. भविष्यकाळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून बंधारे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत वीस बंधारे बुजवण्यात आले असून, उर्वरित बंधारे देखील लवकरच बुजवले जाणार आहेत.”
सध्या उर्वरित बंधारे बुजवण्याचे काम वेगाने सुरू असून, यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रतिनिधी भिवसेन टेमकर,
एनटीव्ही न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.
