जामखेड (अहिल्यानगर): तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचा कारभार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. गावातील नागरी समस्यांचा बोजवारा उडाला असून प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सौ. अफसाना अन्सार पठाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या १५ दिवसांत समस्या न सुटल्यास सहकुटुंब उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम
सौ. पठाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारंवार लक्ष वेधूनही गावातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जर २५ मार्च २०२६ पर्यंत प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर लोणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांसह बेमुदत उपोषण करण्यात येईल.

निवेदनातील ७ प्रमुख मागण्या:
ग्रामविकासाच्या दृष्टीने निवेदनात खालील महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत:
- नियमित पाणीपुरवठा: खैरी तलावातील विद्युत पंप दररोज चालू ठेवून गावाला सुरळीत पाणीपुरवठा करावा.
- भ्रष्टाचाराला लगाम: वैयक्तिक सिंचन विहिरी आणि घरकुल लाभार्थ्यांचे मस्टर व हप्ते वेळेवर काढावेत. तसेच, रोजगार सेवक व इंजिनिअरकडून होणारी पैशांची मागणी त्वरित थांबवावी.
- डिजिटलायझेशन: जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदी वेळेवर करून सर्व दप्तर ऑनलाईन करावे.
- घरकुल योजनेची बिले: पूर्ण झालेल्या घरांचे फोटो काढून लाभार्थ्यांची थकीत बिले अदा करावीत.
- हिशोबाचे पारदर्शक सादरीकरण: २०२१ ते २०२५ या काळात झालेल्या सर्व विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडवा.
- अपूर्ण कामे: गावातील प्रलंबित विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत.
- सौजन्याची वागणूक: ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सन्मानाने वागावे, त्यांचे फोन स्वीकारावेत व योग्य मार्गदर्शन करावे.
गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
गावातील विकासकामांत अडथळा निर्माण करणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महिला सदस्याने थेट उपोषणाचा इशारा दिल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता गटविकास अधिकारी यावर काय निर्णय घेतात आणि लोणी गावातील समस्या मार्गी लागतात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर: नंदू परदेशी
जिल्हा प्रतिनिधी: अहिल्यानगर
