- रस्त्यांची दयनीय अवस्था निविदा रेंगाळल्याचा परिणाम..!
- उद्याने आणि आठवडी बाजाराच्या निधीला स्थगिती मिळाल्याने हल्लाबोल..!

धाराशिव, प्रतिनिधी:
धाराशिव: शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आणि विकासाची दोन वर्षे रेंगाळलेली निविदा प्रक्रिया, यावर शिवसेना (उबाठा) आमदार कैलास घाडगे पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभेत जोरदार आवाज उठवला. तब्बल २२ महिने कामे का थांबली, याला जबाबदार कोण? हे शोधण्यासाठी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
१४० कोटींच्या कामाला २२ महिन्यांची स्थगिती
- मूळ मंजुरी: फेब्रुवारी २०२४ मध्ये नगरविकास मंत्र्यांनी शहरातील रस्त्यांसाठी १४० कोटी रुपये मंजूर केले होते.
- विलंब: निविदा प्रक्रिया स्थगिती आणि पुनर्परीक्षणांच्या फेऱ्यात अडकल्यामुळे आजतागायत प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.
- आरोप: नगरविकास खात्याच्या गोविंदराज यांनी दोन चौकशीत दोन वेगवेगळे निर्णय दिल्याचा उल्लेख करत, निविदा प्रक्रियेला २२ महिने थांबवल्याबद्दल एसआयटी चौकशी आवश्यक असल्याचे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
- परिणाम: शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांचे जीव गेले असून, अनेक नागरिक कायमचे जखमी झाल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले.
उद्याने, बाजारांसाठी मंजूर निधीलाही स्थगिती
आमदार पाटलांनी उद्याने आणि आठवडी बाजारांसाठी मंजूर निधीलाही स्थगिती देण्यात आल्याचे सभागृहात निदर्शनास आणले:
- उच्च न्यायालयाने स्थगिती उठविण्याचे निर्देश देऊनही, धाराशिवमध्ये एकही उद्यान अद्याप अस्तित्वात नाही.
- जिल्ह्याचे ठिकाण असूनही, आठवडी बाजाराच्या निधीलाही स्थगिती दिली आहे.
- मागणी: त्यांनी नगरविकास मंत्र्यांनी या स्थगिती तत्काळ उठविण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.

नगरपालिका आर्थिक कोंडीत
- निधीत घट: १५व्या वित्त आयोगातून नगरपालिकेला मिळणारा निधी मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पूर्वी १५ कोटी रुपये मिळत असताना आता फक्त ३-४ कोटी रुपये मिळत आहेत.
- परिणाम: यामुळे घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, दिवाबत्ती यांसारख्या मूलभूत सेवांवर गंभीर परिणाम होत आहे.
- विनंती: मागील वर्षी एकही हप्ता न मिळाल्याने यंत्रणा विस्कळीत झाल्याचे सांगत त्यांनी शासनाकडे निधीची तातडीने उपलब्धता करून देण्याची विनंती केली.
कचरा डेपो आणि पाणी योजना
- कचरा डेपो: शहरातील कचरा डेपो आता मध्यवस्तीत येऊन पोहोचला असून, दुर्गंधी आणि आरोग्याचे धोके वाढले आहेत. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी डेपो तत्काळ शहराबाहेर हलवण्याची मागणी त्यांनी केली.
- पाणी योजना: तेर, ढोकी, कसबे तुडवळा आणि येडशी या गावांसाठी असलेली संयुक्त पाणीपुरवठा योजना वीजपुरवठा खंडित झाल्याने ठप्प आहे. सव्वा कोटी रुपये खर्चून उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचा लाभही वीजबिल थकबाकीमुळे मिळत नाहीये. त्यांनी वीजबिल हप्त्यांमध्ये भरण्याची मुभा देऊन तात्काळ वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी सभागृहात केली.
आमदार पाटलांनी उपस्थित केलेल्या या गंभीर प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नगरविकास मंत्री सभागृहात उपस्थित होते.
प्रतिनिधी आयुब शेख,
एनटीव्ही न्यूज मराठी, धाराशीव.
