जामखेड नगर परिषद यांनी शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित धारकांना दि.११ फेब्रुवारी रोजी नोटीस बजावत दि. १८ फेब्रुवारीपर्यंत अतिक्रमण स्वतःहून हटवण्याची मुदत दिली होती. मात्र दिलेल्या मुदतीनंतरही अनेक ठिकाणी अतिक्रमण कायम असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या नोटीसकडे नागरिकांनी केराची टोपली म्हणून पाहिले असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी या मार्गावरील इतर ठिकाणची अतिक्रमणे हटविण्यात आली असली तरी जामखेड शहरातील अतिक्रमणे मात्र अद्याप कायम आहेत. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसर तसेच काही सार्वजनिक जागांवर अनधिकृत बांधकामे व तात्पुरती दुकाने उभी करण्यात आली आहेत. वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, पादचाऱ्यांना त्रास होणे तसेच स्वच्छतेच्या समस्याही निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होत्या. त्यानुसार नगर प्रशासनाने नोटीस देत कारवाईचा इशारा दिला होता .
मात्र मुदत संपल्यानंतरही प्रत्यक्ष कारवाई दिसून न आल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जर प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर अशा नोटीसांचा धाक राहणार नाही, अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

बसस्थानक ते खर्डा चौक दरम्यान काही अतिक्रमणे हटविण्यात आली होती; मात्र रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पुन्हा अतिक्रमणे वाढली. काही ठिकाणी गटारांवर टपऱ्या उभारण्यात आल्या असून काही टपऱ्या भाड्याने दिल्याची माहिती समोर येत आहे. गटाराच्या सुमारे तीन मीटर (१० फूट) जागेत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे नियोजन आहे. बीड रोड परिसरात तर गटारांवर पक्की बांधकामे असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे केवळ टपरीधारकांवर कारवाई करून मोठ्या बांधकामांकडे दुर्लक्ष होणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, नगर परिषदेच्या संबंधित विभागाकडून लवकरच संयुक्त पथकाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता प्रशासन प्रत्यक्ष कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्या नगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *