• मंगरूळपीर तालुका कृषी विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; वसुलीच्या सूचना असतानाही दिले अनुदान..!

मंगरूळपीर प्रतिनिधी | दिनांक: ४ एप्रिल २०२६

वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत फळबाग लागवड योजनेत सुरू असलेला अनागोंदी कारभार आता शिगेला पोहोचला आहे. गोगरी, हिरंगी, खेर्डा, चोरद, येडशी आणि भुर येथील अनियमिततेची प्रकरणे ताजी असतानाच, आता अपात्र शेतकऱ्याला मेहेरबान होऊन अनुदान दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

तपासणीत ‘शून्य’ झाडे, तरीही ५,१०० रुपयांचा निधी!

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, खुद्द वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलेल्या लाभार्थ्यालाच निधी वितरीत करण्यात आला आहे:

  • प्रत्यक्ष पाहणी: १३ जानेवारी २०२६ रोजी तत्कालीन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मौजे गोगरी येथील एका सीताफळ बागेची पाहणी केली होती. तिथे एकही झाड जिवंत नसल्याचे आढळल्याने त्यांनी संबंधित लाभार्थ्याला ‘अपात्र’ ठरवून पूर्वी दिलेल्या अनुदानाची वसुली करण्याचे तोंडी व लेखी आदेश दिले होते.
  • नियमबाह्य कृती: या स्पष्ट सूचना असतानाही, २० मार्च २०२६ रोजी मंडळ कृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांनी याच अपात्र शेतकऱ्याच्या नावे रासायनिक खतासाठी ५,१०० रुपयांचा ‘निधी हस्तांतरण आदेश’ (FTO) काढून नरेगा आयुक्त नागपूर यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

पात्र शेतकरी वाऱ्यावर, अपात्रांवर ‘कृपा’

एकीकडे गोगरीतील ११, चोरदचे ५ आणि येडशीचे ४ पात्र शेतकरी हक्काच्या अनुदानासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत, तर दुसरीकडे ज्यांच्या शेतात झाडेच नाहीत, अशांना बसल्या जागी निधी दिला जात आहे. “पात्र लाभार्थी उपाशी आणि अपात्र मात्र तुपाशी” अशी संतप्त प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

वरिष्ठ गप्प का? ‘सेटलमेंट’ची चर्चा जोरात!

या गंभीर गैरप्रकाराची माहिती वरिष्ठांना असूनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

  • शेतकऱ्यांचा सवाल: “आमचा वाली कोण?” असा रोकडा सवाल पीडित शेतकरी विचारत आहेत.
  • चौकशीची मागणी: मार्चअखेर अनुदान मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.

वरिष्ठ अधिकारी या ‘भ्रष्ट’ कारभारावर बडगा उगारणार की प्रकरण ‘सेटल’ करून दाबणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


वृत्त संकलन: फुलचंद भगत, प्रतिनिधी, मंगरूळपीर, वाशिम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *