• मंगरूळपीरसह वाशिम परिसरात गारपीट; बळीराजा संकटात, तातडीने पंचनामे करण्याची मागणी..!

वाशिम प्रतिनिधी | दिनांक: ४ एप्रिल २०२६

वाशिम: वाशिम जिल्ह्यात शुक्रवार, ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले. मंगरूळपीर तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत गारांचा पाऊस पडल्याने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

अंधारसदृश्य स्थिती आणि वीज गुल

मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. १ व २ एप्रिल रोजी मालेगाव, कारंजा आणि मानोरा तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाला होता. मात्र, ३ एप्रिल रोजी सायंकाळी आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन भरदिवसा अंधारसदृश्य स्थिती निर्माण झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांतील झाडे उन्मळून पडली असून वीज पुरवठा तासनतास खंडित झाला होता.

फळबागांना मोठा फटका

यंदा आंब्याला चांगली फलधारणा झाली होती, मात्र या वादळी पावसाने आंब्याचा मोहोर आणि कैऱ्या गळून पडल्या आहेत.

  • नुकसान झालेली पिके: आंबा, संत्रा, लिंबू आणि टरबूज या फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
  • कांदा उत्पादक धास्तावले: जिल्ह्यात यंदा बीजवाई कांद्याची मोठी लागवड करण्यात आली आहे. हे पीक आता काढणीच्या अंतिम टप्प्यात असतानाच पावसाचा तडाखा बसल्याने कांदा सडण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

पंचनाम्यांची मागणी

अचानक आलेल्या या संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. पावसाने हातातोडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने या नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी आर्त हाक जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी दिली आहे.


वृत्त संकलन: प्रतिनिधी फुलचंद भगत, वाशिम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *