फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानाचा मुद्दा दररोज वृत्तपत्रातून गाजत असतांना सन २०२५-२६ या वर्षातील पात्र लाभार्थ्यांच्या फळबागेच्या कुशल , सामुग्री अनुदानाचा मुद्दा मार्च महिन्याचे अखेरीच्या दिवशीही निकाली नसल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.या सर्व अंदाजे ९० शेतकऱ्यांच्या बिलावर व मापन पुस्तिकेवर खाडाखोड केल्याचे समजते पण ही खाडाखोड कुणी व का केली? हे मात्र अद्याप निष्पन्न झाले नसल्याचे वृत्त आहे.सर्व शेतकऱ्यांचे मूळ बिलावर व मापन पुस्तिकेवर झालेली खाडाखोड ही तालुका कृषी कार्यालयात झालेली असली तरीही, याबाबत आमच्या कार्यालयाने खाडाखोड केली नसल्याचे स्पष्ट मत प्रभारी तालुका कृषी अधिकारी यांनी व्यक्त केल्याची भावना नाव न सांगण्याच्या अटीवर एका कृषी अधिकाऱ्याने सांगीतली. शेतकऱ्यांच्या फळबागेच्या अनुदानाचा प्रश्न ऐरणीवर असतांना खाडाखोड कुणी केली? याबाबत अनभिज्ञता असणे खूप गंभीर आहे.शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी स्थापित कार्यालयाचे प्रमुख इतके बेफिकीर कसे असू शकतात? हे विचार करण्यास भाग पाडणारे आहे.

संबंधित सर्व कृषी अधिकारी यांनी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या मिळविण्यासाठी भेट घेऊन विनंती केल्याची माहिती असून गुप्त बैठकही पार पडल्याची कळले आहे, तथापि या बैठकीतून कुठलाही सकारात्मक तोडगा निघू शकला नसल्याची माहिती आहे.दिवसोगणिक या अनियमितता प्रकरणातील संदिग्धता वाढत असून शेतकऱ्यांच्या अनुदान प्रकरणावर कुठलाच तोडगा निघत नसल्याचे दिसत असले तरीही या प्रकरणाची वरिष्ठांकडुन साधी चौकशीही झाली नसल्याने सर्व काही आलबेल असल्याचे कृषी विभागाकडून भासविले जात असले तरीही शेतकरी मात्र पुरते भरडल्या जात असल्याची सध्या स्थिती आहे.शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्यास जबाबदारी नेमकी कुणाची? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत असून, कोणताच कृषी अधिकारी व कर्मचारी यावर बोलायला तयार नसल्याने या प्रकरणातील गूढ अजून वाढत आहे. शेतकरी मात्र आशाळभूत नजरेने या सर्व घटनेकडे पाहत असून अजूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळेल याची आशा आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की बिलावर खाडाखोड करणे ही बाब अत्यंत गंभीर असतांना खाडाखोड कुणी केली हे निष्पन्न होत नसेल तर कार्यालयाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे दिसते. फळबागेच्या बिले व मापन पुस्तिकेवरील खाडाखोड करणाऱ्या कर्तबगार व्यक्तीची ओळख पटणे आवश्यक झाले असल्याने या प्रकरणाची चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे काही बाधित शेतकऱ्यांनी मत व्यक्त केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *