आमदार रोहीत पवार व कर्जत वकील संघाच्या प्रयत्नांना यश

कर्जत : कर्जत तालुक्यातील नागरिकांना आणि पक्षकारांना स्थानिक स्तरावर न्याय मिळावा, यासाठी मंजूर करण्यात आलेले ‘अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय’ लवकरात लवकर सुरू व्हावे, याकरिता आज शासन दरबारी अत्यंत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका वकील संघाच्या शिष्टमंडळाने आज मुंबईतील मंत्रालयात विधी व न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत विधी व न्याय विभागाने शासकीय स्तरावरील उर्वरित प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कर्जत येथे न्यायालय सुरू करण्याची महत्त्वपूर्ण हमी दिली आहे.

कर्जत येथे उच्च न्यायालयाने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि कार्यालयीन कामकाज सुरू होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा होणे गरजेचे होते. हीच बाब लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला.

आज मंत्रालयात विधी व न्याय विभागाचे सचिव दिलीप घुमरे आणि सहसचिव गायकवाड यांच्यासोबत ही महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी आमदार पवार यांनी हे न्यायालय सुरू झाल्यास कर्जत तालुक्यातील हजारो पक्षकारांची आणि वकिलांची

होणारी सोय, वेळेची बचत आणि प्रलंबित खटल्यांचा निपटारा याकडे लक्ष वेधले. या चर्चेनंतर विधी व न्याय विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत, शासन स्तरावरील सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच हे न्यायालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या बैठकीवेळी शिष्टमंडळात कर्जत तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संग्राम ढेरे, माजी अध्यक्ष ॲड. धनराज राणे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. रामदास पुराणे, ॲड. अशोक कोठारी
यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचीही उपस्थिती होती.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रक्रियेला वेग आल्याने कर्जतच्या न्यायालयीन क्षेत्रात आणि वकील संघात मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यायालयाचे कामकाज प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर तालुक्यातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जाण्याचा त्रास वाचणार असून, घरबसल्या किंवा स्थानिक स्तरावरच कायदेशीर दिलासा मिळणे सुलभ होईल. आमदार रोहित पवार आणि कर्जत वकील संघाच्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल तालुक्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.

नंदु परदेशी
जिल्हाप्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *