अहिल्यानगर आता आधुनिक वैद्यकीय सेवेकडे वेगाने वाटचाल करत आहे – डॉ. सुजय विखे पाटील

ही केवळ हॉस्पिटलची नव्हे, तर शहराच्या प्रगतीची सुरुवात ; आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)
अहिल्यानगर शहरातील साताळकर लोटस रुग्णालयात अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली सुरू होत शहराच्या आरोग्य क्षेत्रात नवा ठसा उमटवला आहे. रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करणारी सुविधा उपलब्ध करून देणारे हे शहरातील पहिलेच रुग्णालय ठरले असून, त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आता उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवरच मिळणार आहे.

अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पार पडलेल्या या भव्य उद्घाटन सोहळ्यास भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप, हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्री, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सातारकर, तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, अहिल्यानगरसारख्या शहरात रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली सुरू होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. यामुळे रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज कमी होणार असून, वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होणार आहे. साताळकर लोटस रुग्णालयाने आधुनिक वैद्यकीय सेवेत नवा मापदंड निर्माण केला असून, ही सुविधा भविष्यातील आरोग्यसेवेचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, ही सुविधा केवळ एका रुग्णालयापुरती मर्यादित नसून, संपूर्ण शहराच्या प्रगतीचे प्रतीक आहे. अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित उपचार सेवा आपल्या शहरातच उपलब्ध होत आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

कार्यक्रमात डॉ. तनवर यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, रोबोट हा डॉक्टरचा पर्याय नसून एक अत्याधुनिक सहाय्यक आहे. डॉक्टरच्या नियंत्रणाखाली तो अधिक अचूक, स्थिर आणि सूक्ष्म हालचाली करतो, ज्यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि प्रभावी होते. यामुळे रुग्णांना कमी वेदना होतात, रक्तस्राव कमी होतो आणि रुग्ण लवकर बरे होतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी डॉ. सतीश सोनवणे यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. तसेच महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती सानप मॅडम, नगरसेवक निखिल वारे, महेश लोंढे, विविध मान्यवर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.