मोरगाव : (प्रतिनिधी)
वडगाव-निंबाळकर ता बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये बेकायदेशीर दारू विक्री, मटका तसेच ऑनलाईन जुगाराचे प्रमाण वाढल्याची चर्चा आहे. या अवैध व्यवसायांमुळे दैनंदिन लाखो रुपयांची उलाढाल होते. येथील सर्व गैर व्यवसाय बाबत पोलीस प्रशासनाला माहीत असूनही कारवाई होत नसल्याची तक्रार आहे
परिसरातील काही गावांमध्ये उघडपणे तसेच लपूनछपून देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असल्याचे सांगितले जाते. तसेच मटका आणि विविध मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन जुगाराचे जाळे ग्रामीण भागात पसरले आहे. अल्पावधीत मोठा आर्थिक फायदा होण्याच्या आमिषामुळे अनेक युवक या प्रकारांकडे आकर्षित होतात. परिणामी अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत असून कौटुंबिक वाद, कर्जबाजारीपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांच्या मते, काही ठिकाणी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांच्या आसपासही या अवैध धंद्यांचे जाळे कार्यरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आणि युवकांवर चुकीचा परिणाम होत आहे.
व्यसनाधीनतेमुळे अनेक तरुणांचे शिक्षण व रोजगाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महिलावर्गाकडूनही या प्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दारूच्या व्यसनामुळे घरगुती कलह वाढत असून कुटुंबाच्या उत्पन्नाचा मोठा भाग व्यसनावर खर्च होत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडत असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी वडगाव-निंबाळकर पोलीस प्रशासनाने या बेकायदेशीर धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या भागातील सर्व अवैध गैर व्यवसायिकांबाबत पोलिसांकडे सविस्तर माहिती आहे. परंतु कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराज आहे.नियमित छापेमारी, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई तसेच जनजागृती कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील युवकांना व्यसन आणि जुगाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. बेकायदेशीर दारू, मटका आणि ऑनलाईन जुगारावर प्रभावी नियंत्रण मिळवल्यास परिसरातील सामाजिक वातावरण अधिक सुरक्षित आणि निरोगी राहण्यास मदत होईल,
उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे...
सुरू असलेल्या गैर व्यवसायाचा सर्वाधिक त्रास हा या परिसरातील महिलांना सहन करावा लागतो. राज्याच्या उपमुख्यमंत्री यादेखील महिलाच आहेत यामुळे यांनी या प्रश्नाकडे विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा वडगाव निंबाळकर सह सोमेश्वर मुर्टी,मोढवे, पळशी व लोणी – भापकर भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याबाबत पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा काही सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना याबाबत निवेदन पाठवण्यात आले.
मनोहर तावरे मोरगाव
