प्रशासनाचा इशारा: राष्ट्रीय महामार्गावरील अवैध बांधकामे ८ दिवसांत स्वतःहून काढून घेण्याचे आदेश.
जिल्हाधिकाऱ्यांची बैठक: जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये महसूल आणि महामार्ग विभागाची महत्त्वाची बैठक संपन्न.
वाहतूक कोंडीचा विळखा: रखडलेले काम आणि अतिक्रमणांमुळे खर्डा चौक ते बीड कॉर्नर परिसरात नागरिक हैराण.
खर्च वसुलीचा पवित्रा: स्वतः अतिक्रमण न काढल्यास प्रशासन कारवाई करणार आणि त्याचा खर्चही संबंधित धारकाकडून वसूल केला जाणार.
AHILYANAGAR | जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. खर्डा चौक ते बीड कॉर्नर दरम्यान असलेली अवैध बांधकामे ८ दिवसांत स्वतःहून काढून घेण्याच्या नोटिसा राष्ट्रीय महामार्ग उपविभागामार्फत बजावण्यात आल्या आहेत.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत जामखेड पंचायत समितीत पार पडलेल्या बैठकीनंतर ही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. १ व २ एप्रिल रोजी झालेल्या संयुक्त मोजणीत समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नर परिसरात महामार्गाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याचे स्पष्ट झाले होते. या अतिक्रमणांमुळे शहरात नित्याचीच वाहतूक कोंडी होत असून धुळीचा आणि खाचखळग्यांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
विशेषतः खर्डा चौक परिसरात वाहनांच्या रांगा लागत असल्याने रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत जर ही अतिक्रमणे काढली नाहीत, तर संयुक्त मोहीम राबवून ती हटवली जातील. विशेष म्हणजे, या कारवाईचा संपूर्ण खर्च संबंधित अतिक्रमणधारकाकडूनच वसूल केला जाणार असल्याचा इशारा उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, पाथर्डी यांनी दिला आहे. या मोहिमेमुळे जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नंदू परदेशी, जिल्हा प्रतिनिधी, एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर
