त्र्यंबकेश्वर व चोंडी येथून निघालेल्या यात्रा शिर्डीत एकत्र; पुढील प्रवास मध्यप्रदेशकडे
शिर्डी, दि. २७/०४/२०२६
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबा यांच्या पावन भूमीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयघोषात भव्य जलयात्रेचे आगमन झाले. शिर्डी येथे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या दोन्ही यात्रा एकत्र दाखल झाल्या. या जलयात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची खासियत म्हणजे गोदावरी नदीच्या उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथून आणि अहिल्यादेवींच्या जन्मस्थळ चोंडी येथून एकाच वेळी यात्रेला सुरुवात करण्यात आली.

दोन्ही यात्रा शिर्डीत एकत्र येऊन सोमवारी मध्यप्रदेशकडे रवाना होणार आहेत. राज्यातील विविध नद्यांमधून आणलेल्या जलकलशांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिर्डीतील मल्हारी मार्तंड मंदिरात पूजन करून यात्रेचे स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून जलकलशांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेतून जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाचा संदेश देण्यात आला.
जलयात्रेतील अहिल्यादेवींचा पुतळा आणि जलकलशाचा रथ हे प्रमुख आकर्षण ठरले. धनगर नृत्याने वातावरण रंगले, तर मंत्री विखे पाटील व सहभागी आमदारांचा बसमधून केलेला प्रवास चर्चेचा विषय ठरला.
सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, अहिल्यादेवी होळकर यांची जलसंवर्धनाची चळवळ प्रेरणादायी असून त्यांनी दिलेला सांस्कृतिक वारसा आजही मार्गदर्शक आहे. तसेच दासगणू महाराज यांनी ‘साईबाबा सुवर्ण मंजिरी’ हा ग्रंथ महेश्वर येथे लिहिल्यामुळे शिर्डी आणि महेश्वर यांचे आध्यात्मिक नाते अधिक दृढ झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
