DHARASHIV | शहरातील श्री महात्मा बसवेश्वर विद्यालयातील इयत्ता दहावी सन 1998 बॅचचा स्नेह मेळावा 25 एप्रिल 2026 रोजी उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल 28 वर्षांनंतर एकत्र आलेल्या सुमारे 90 माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग नोंदवत जुन्या आठवणींना उजाळा दिला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. नेताजी गायकवाड होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ. कपिल चंद्रकांत महाजन उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागतपर भाषणातून स्नेह मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले.


यानंतर माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात फेरफटका मारत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ. कपिल महाजन, मुख्याध्यापक श्री. गायकवाड तसेच शिक्षकवृंदांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शिवदास कुलकर्णी, माधव माने, सुनील बटगिरे, संजय कोथळीकर, शरद गायकवाड, मायाचारी श्रीधर, रत्नदीप मालखरे, पाटील मॅडम, होदलूरकर आणि बेंडगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


मार्गदर्शनपर भाषणात डॉ. कपिल महाजन यांनी परिश्रम, सातत्य आणि मूल्याधिष्ठित जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले, तर मुख्याध्यापक श्री. गायकवाड यांनी मैत्रीचे बंध जपण्याबरोबरच समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमादरम्यान डॉ. अनिल दूधभाते यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव व शालेय आठवणी शेअर केल्या. डॉ. विजय बेडदुर्गे, लिंगराज स्वामी, अभिषेक माशाळकर, डॉ. स्वाती हत्ते आणि कवयत्री वर्षा पाठक यांनी गीत गायन सादर करून वातावरण रंगतदार केले. विनोदी किस्से, खेळ आणि गप्पांमुळे कार्यक्रमाला विशेष रंग चढला. सामूहिक भोजनानंतर सर्वांनी एकत्रित छायाचित्रांद्वारे आठवणी जतन केल्या.
या स्नेह मेळाव्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, गुजरात, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर, वर्धा तसेच पुणे व मुंबई येथूनही माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यामुळे मेळाव्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.


या मेळाव्यामुळे जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ झाले असून, भविष्यातही अशा भेटी नियमित आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच शाळेच्या विकासासाठी व सामाजिक उपक्रमांसाठी एकत्रितपणे कार्य करण्याची भावना व्यक्त झाली.


कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन माजी विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहकार्य, नियोजन आणि मेहनतीमुळे शक्य झाले. सोमनाथ शिंदे, दिपक चिंचोळे, योगेश जोशी (पुणे), अमोल हिरवे, स्वाती कोरके (सोलापूर), वर्षा हुंजे (डोंबिवली), ज्योती दळगडे आणि संगीता गुड्डा (बंगळुरू) यांनी विशेष प्रयत्न केले.

सचिन बिद्री : उमरगा