- ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज’ला राज्य सरकारची अंतिम मंजुरी.
- १०० विद्यार्थी क्षमता आणि ४३० खाटांचे अद्ययावत रुग्णालय यंदापासूनच सेवेत.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडीत दिलेल्या आश्वासनाची वर्षभरातच पूर्तता.
- जिल्हा रुग्णालयाच्या (सिव्हिल) आवारातच सुरू होणार वैद्यकीय शिक्षणाचे नवे दालन.
AHILYANAGAR | अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शहराच्या ‘सिव्हिल’ हॉस्पिटलमध्ये अखेर शासकीय मेडिकल कॉलेज सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, याच शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
राज्यात नव्याने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर’ यंदापासून कार्यान्वित होत आहे. मागील वर्षी ६ मे २०२५ रोजी अहिल्यादेवींचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कॉलेजची घोषणा करण्यात आली होती. अवघ्या वर्षभरात महायुती सरकारने या घोषणेची अंमलबजावणी करून अहिल्यानगरकरांना मोठी भेट दिली आहे.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या मेडिकल कॉलेजसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत हे कॉलेज आता प्रत्यक्षात येत आहे. या कॉलेजमध्ये प्रतिवर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून, ४३० बेडची क्षमता असलेले रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६ पासूनच याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना आता आपल्याच जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
प्रतिनिधी, अहिल्यानगर.
