मा.श्री.राजा माने साहेब यांनी व्यापक समाजहित डोळ्यांसमोर ठेवून अतिशय कष्टाने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली व संघटनेचा विस्तार करण्यासाठी अनेक उपक्रमांद्वारे प्रचंड परिश्रम घेतले, यामधील काही घटनांचा मी देखील साक्षीदार आहे. या लोकोपयोगी कार्यासाठी त्यांना कोणत्याही श्रेयवादात न अडकणारे व समाजहिताच्या मुलभूत कामावर लक्ष केंद्रित करून कार्यरत असणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा राज्य भाजपाचे ज्येष्ठ नेते मा.ना.श्री.चंद्रकांत दादा पाटील यांची खंबीर साथ लाभत असते याची प्रचिती येते.

संघटनेचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन पुस्तकाच गाव म्हणून ओळखले जात असलेल्या “भिलार” या सातारा जिल्ह्यातील पाचगणी जवळील गावात आयोजित केले होते. त्या कार्यक्रमातील एका चर्चासत्रात वक्ता या नात्याने मी सहभागी झालो होतो. त्याचवेळी त्यांची या विषयावरील आस्था, या क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी मित्रांच्यासमोर येत असलेल्या अडचणी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी करावयाचे प्रयत्न यांचे जवळून आकलन झाले.

वास्तविक मा.श्री.राजा माने साहेब हे सिध्दहस्त लेखक आहेत, पत्रकार आहेत व त्यांनी संपूर्ण पत्रकारिता ही वृत्तपत्र क्षेत्रात केली आहे. ज्येष्ठ पत्रकार व संपादक म्हणून त्यांना समाजमान्यता आहे. ते पत्रकारिता क्षेत्राच्या दैनंदिन कामातून विशेषतः लोकमत समुहातील कामातून कार्यमुक्त झाल्यानंतर त्यांनी या समाजासाठी उपयुक्त असलेल्या मात्र सद्यस्थितीत असंघटित असलेल्या डिजिटल मिडिया पत्रकारांच्या समस्या लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावरील संघटन उभे करण्याचा निर्णय घेतला व आज ते यशस्वीपणे उभे झाले असल्याचे दिसून येते. खरतर आज ६६व्या वर्षी ते करत असलेले सामाजिक काम पाहून मलादेखील प्रेरणा आणि उर्जा मिळते.

नुकतेच गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन घेतले, या क्षेत्रासमोरील आव्हाने व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचे प्रयत्न यावर चर्चा, विचारमंथन केले. तर समाजहितासाठी झटणाऱ्या काही लोकांचा सन्मान केला हे अभिनंदनीय आहे आणि प्रेरणादायी आहे. या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल आज बार्शी येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी विविध विषयांवर छान संवाद झाला.

मा.श्री.राजा माने साहेब यांना या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.!

  • अनिल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *