- भव्य मिरवणूक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी महामानवाला अभिवादन.
- शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन.
- महिलांसाठी उखाणे व संगीत खुर्चीसह विविध सांस्कृतिक उपक्रम.
- दीपककुमार वाघ यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाने जिंकली उपस्थितांची मने.
CH.SAMBHAJINAGAR | गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महामानवाच्या विचारांना उजाळा देत, नेवरगावकरांनी हा उत्सव थाटामाटात साजरा केला.
नेवरगावमध्ये जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची सुरुवात भव्य मिरवणुकीने झाली, ज्यामध्ये पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केवळ मिरवणूकच नाही, तर प्रबोधनावर भर देत समितीने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये स्थानिक आणि बाहेरील विद्यार्थ्यांनी महामानवाच्या जीवनावर प्रभावी भाषणे सादर केली.

महिलांसाठी रांगोळी, उखाणे आणि संगीत खुर्ची यांसारख्या स्पर्धा घेत त्यांनाही या उत्सवात सहभागी करून घेण्यात आले. यशस्वी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. रात्री दीपककुमार वाघ यांच्या ‘सा रे ग म’ भीमगीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने जयंती सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे, नगरसेवक दिनेश गायकवाड, कांताताई गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती व दिनेश गायकवाड मित्र मंडळाने या सर्व उपक्रमांचे नेटके नियोजन केले होते.
प्रतिनिधी, अमोल पारखे, गंगापूर.
