वाढोणा गावातील आदिवासी समाजाचा तरुण इकबाल तडवी आता बनला पोलीस अधिकारी.


वयाच्या १९ व्या वर्षी पोलीस दलात भरती, आता जिद्दीच्या जोरावर मिळवले PSI पद.


गरिबी आणि हालाखीवर मात करत गावाला मिळवून दिला पहिला पोलीस उपनिरीक्षक.


अपयशावर मात करत मेहनतीने पूर्ण केले ‘अधिकारी’ होण्याचे स्वप्न.


JALNA | जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाढोणा या छोट्याशा गावासाठी आजचा दिवस सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला आहे. येथील आदिवासी समाजातील सुपुत्र इकबाल शेरखा तडवी यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असून, गावातून पहिले अधिकारी होण्याचा मान त्यांनी पटकावला आहे.

इकबाल तडवी यांची ही कहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे. आदिवासी समाजातील असलेल्या इकबाल यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. मात्र परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी शिक्षण आणि मेहनतीचा मार्ग निवडला. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात सोलापूर शहर पोलीस दलात भरती होऊन त्यांनी खाकी वर्दी अंगावर चढवली होती.
पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असतानाही, त्यांचे डोळे अधिकारी होण्याच्या स्वप्नाकडे लागले होते. PSI होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी गेल्या काही वर्षांत अथक परिश्रम घेतले. या प्रवासात त्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला, नशिबानेही अनेकदा साथ दिली नाही. मात्र, इकबाल कुठेही थांबले नाहीत. रात्रंदिवस अभ्यास आणि मैदानी सरावाच्या जोरावर त्यांनी आपला लढा सुरू ठेवला. अखेर त्यांच्या मेहनतीला यश आले असून पोलीस उपनिरीक्षक पदी त्यांची निवड झाली आहे.
इकबाल यांच्या निवडीची बातमी कळताच वाढोणा गावात आनंदाला उधाण आले आहे. वाढोणा गावातून यापूर्वी कोणीही पोलीस उपनिरीक्षक झाले नव्हते, त्यामुळे इकबाल हे गावचे पहिले PSI ठरले आहेत. त्यांच्या या यशाने गावातील इतर तरुणांना नवी उमेद मिळाली आहे. एका गरीब कुटुंबातील तरुणाने शिपायापासून ते थेट अधिकारी पदापर्यंत घेतलेली ही भरारी कौतुकास्पद ठरत आहे. सध्या इकबाल तडवी यांच्यावर मित्र परिवार आणि समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जब्बार तडवी,

जालना / भोकरदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *