WASHIM | वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. कारंजा शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक ०४/०५/२०२६ रोजी कारंजा शहर येथे आयपीएलमधील लखनऊ विरुद्ध मुंबई इंडियन्स या क्रिकेट मॅचवर सट्टा लावून पैशाने हारजीत केली जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करून कारंजा येथे रवाना करण्यात आले. पथकाने कारंजा शहर हद्दीतील द्वारका कॉलनी, सिंधी कॅम्प येथील एका बंद खोलीत छापा टाकला असता, सोपाण अशोक लोणागरे (वय ३२, रा. पिंजर, जि. अकोला) याच्यासह इतर ३ इसम सट्टा खेळताना मिळून आले.
या कारवाईत पोलिसांनी ६ मोबाईल, १ टॅब, १ मोटार सायकल आणि रोख रक्कम असा एकूण १,३३,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, पो.नि. प्रदीप परदेशी, पो.उप.नि. शेखर मास्कर व स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने केली आहे. जिल्ह्यात अवैध कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगतानाच नागरिकांनी अशा बेकायदेशीर हालचालींबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी केले आहे.
फुलचंद भगत, वाशिम
