• गोपनीय माहितीच्या आधारे मंगरूळपीर पोलिसांनी शेलुबाजार येथे रचला सापळा.
  • ३८ वर्षीय तस्कराच्या घरातून ८७४० रुपये किमतीचा ८७४ ग्रॅम गांजा हस्तगत.
  • फॉरेन्सिक टीमकडून मुद्देमाल सील; एन.डी.पी.एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
  • उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखालील टीमची यशस्वी कामगिरी.

WASHIM | वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार येथे अवैध गांजा तस्करी करणाऱ्या एका ३८ वर्षीय इसमाच्या मुसक्या आवळण्यात मंगरूळपीर पोलिसांना मोठे यश आले आहे.

दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी मंगरूळपीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेलुबाजार येथे अवैध गांजा या अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षिरसागर, पोउपनि महादेव सोळंके आणि त्यांच्या पथकाने संबंधित इसमाच्या राहत्या घरी सापळा रचून धाड टाकली.

दोन पंच आणि फोटोग्राफरच्या समक्ष घराची झडती घेतली असता, एका कापडाच्या पिशवीत ८७४ ग्रॅम गांजा मिळून आला, ज्याची किंमत साधारणतः ८७४० रुपये इतकी आहे. या कारवाईनंतर तातडीने फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, त्यांनी सदर मुद्देमाल सील केला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध मंगरूळपीर पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या कारवाईत पोलीस कर्मचारी राम राऊत, रमेश राऊत, सुमित चव्हाण आणि महिला पोलीस कर्मचारी सुलताना सय्यद यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

एनटीव्ही न्यूज मराठी, वाशिम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *