पाच ठिकाणी धाड; मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त, नागरिकांकडून स्वागत
( मनोहर तावरे )
मोरगाव : मोरगाव, ता. बारामती मोरगाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवत पाच वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी धाड टाकून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे.
मोरगाव व परिसरातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गावांमध्ये काही व्यक्तींकडून नियमबाह्य पद्धतीने दारूची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नियोजनबद्ध कारवाई करत पाच संशयित ठिकाणांवर छापे टाकले. या धाडीत विविध प्रकारच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या, तसेच विक्रीसाठी साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील दारूसाठा जप्त करण्यात आला.
कारवाईदरम्यान संबंधित व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत हजारो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. बेकायदेशीर दारू विक्रीमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून अनेक कुटुंबांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. महिलांनीही पोलिसांच्या या धाडसी कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत अशा मोहिमा नियमितपणे राबविण्याची मागणी केली.
गेल्या काही काळापासून परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीचा व्यवसाय वाढीस लागल्याने सामाजिक वातावरण बिघडत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली होती. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर पावले उचलली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गैरव्यवसायिकांची गंभीर दखल घेऊन – प्रकाश पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक )
बेकायदेशीर व्यवसाय कायमस्वरूपी नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दृष्टीने आम्ही विशेष टीम तयार केले आहेत. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सातत्याने या गैरव्यवसायविरुद्ध कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना गुप्त माहिती द्यावी.असे आवाहन केले.
"परिसरातील बेकायदेशीर दारू विक्री कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. अशा धंद्यांविरोधात सातत्याने कारवाई केली जाईल आणि कायमस्वरूपी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे," असा निर्धार पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या कारवाईमुळे मोरगाव परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाला असून सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नागरिकांनीही संशयास्पद बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी – मनोहर तावरे (बारामती)
