मोरगाव : बारामती तालुक्यातील अनेक मार्गावर सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात टाळण्यासाठी सर्वत्र नागरिकांनी मदत करणे आवश्यक आहे. ‘सुपा’ पोलीस ठाण्यात याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विभागातील अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत प्रमुख रस्त्यांवर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी माहिती देण्यात आली. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील धोकादायक व अपघातप्रवण ठिकाणांची ओळख करून त्याठिकाणी आवश्यक माहिती फलक लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात आले
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत दि. 31 ऑक्टोबर 2019 रोजी आदेश जारी केलेल्या शासन निर्णय व परिपत्रकाची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
यावेळी आयोजित बैठकीत बोलताना सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. रस्त्यावर अपघात घडल्यास स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था व स्वयंसेवकांनी तात्काळ मदतीसाठी पुढे यावे तसेच पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अपघातानंतरच्या पहिल्या काही मिनिटांत मिळालेली मदत अनेकांचे प्राण वाचवू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत रस्ते सुरक्षेसंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सूचना फलक उभारणे, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे, धोकादायक ठिकाणी प्रकाशयोजना सुधारणे, वेगमर्यादा फलक बसविणे आणि वाहनचालकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे याबाबत उपस्थितांनी सूचना मांडण्यात आले.
बैठकीस बारामती तालुका परिवहन विभागाचे निरीक्षक गंगाधर मेकलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत बोरकर, विविध गावांतील ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गायकवाड सह विशाल गजरे पोलीस शिपाई तुषार जैनक वाहतूक विभागाचे सागर वाघमोडे यांनी या विषयी अधिक माहिती दिली
शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. यामुळे सुपा पोलीस ठाणे हद्दीतील प्रमुख मार्ग अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
