( मनोहर तावरे )

मोरगाव : बारामतीच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये बोगस नंबर प्लेट लावलेल्या दुचाकी तसेच मालवाहू वाहनांचा वापर वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अशा वाहनांचा वापर बेकायदेशीर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कामांसाठी होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या येथील अनेक रस्त्यांवर बनावट वाहने चुकीच्या नोंदणी क्रमांकासह फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वाहनांवरील नंबर प्लेट नियमबाह्य पद्धतीने तयार करण्यात आल्याने या गाड्यांची ओळख पटविणे कठीण होते. चोरी, अवैध वाहतूक, दारू तस्करी, मटका-जुगाराशी संबंधित हालचाली तसेच इतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये अशा वाहनांचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्व वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांमध्ये याबाबत नाराजी आहे. संबंधित वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विशेषतः गावागावांत अचानक तपासणी मोहिमा राबवून वाहनांचे नोंदणी क्रमांक, कागदपत्रे, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र आणि मालवाहतूक परवान्यांची पडताळणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

नागरिकांच्या अपेक्षाप्रमाणे परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून संशयित वाहनांची तपासणी करावी. सीसीटीव्ही यंत्रणांचा वापर, वाहन क्रमांक पडताळणी तंत्रज्ञान तसेच नियमित नाकाबंदीच्या माध्यमातून अशा वाहनांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

        बारामती ग्रामीण भागात सुरक्षित वातावरण राखण्यासाठी बोगस नंबर प्लेटधारक वाहनांवर कठोर कारवाई करावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती देताना
सुरेंद्र निकम (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती)
परिवहन विभागाच्या वतीने यांनी सांगितले की , रस्ते सुरक्षा अंतर्गत तपासणीत करत असताना बोगस नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करू यासाठी लवकरच विशेष मोहीम राबवणार आहेत.असे बारामती परिवहन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांनी याबाबत परिवहन विभागाला गुप्त माहिती द्यावी असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *