गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील वडेगाव येथे दूषित पाणीपुरवठ्यामुळे अतिसाराची साथ उद्भवली आहे. गेल्या पाच दिवसांत ४५ जणांना अतिसाराची लागण झाल्याचे समोर आले असून, आरोग्य विभागाने गावातच आरोग्य कॅम्प सुरू करून बाधितांवर उपचार सुरू केले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला अंतर्गत येणाऱ्या वडेगावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गावात तीन बोअरवेल, तीन सौरपंप आणि नळ योजनांच्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र, पाण्याच्या टाक्यांची नियमित साफसफाई व देखभाल होत नसल्याने दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दूषित पाणी प्यायल्यानंतर अनेक ग्रामस्थांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर गावात आरोग्य कॅम्प सुरू करण्यात आला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी वडेगावला भेट देऊन पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, पाइपलाइन व नळ दुरुस्ती करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या. पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होईपर्यंत संबंधित टाकीतून पाणीपुरवठा करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *