गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील गांधीटोला परिसरात आज पहाटे घडलेल्या भीषण अपघातात ट्युशनला जात असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत विद्यार्थिनीचे नाव कु. मोहिनी ऊर्फ मोनाली मेन्ढे (वय १६, रा. गांधीटोला) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोनाली ही आज १८ मे रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान गांधीटोला येथून साखरीटोला येथे ट्युशनसाठी जात होती. यावेळी गांधीटोला-साखरीटोला मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या पेट्रोल टँकर क्रमांक MH-40-CM-5929 ने तिला मागून जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात मोनाली गंभीर जखमी झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने तिला ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी भुमेश्वर श्रीराम मेन्ढे यांच्या फिर्यादीवरून आरोपी वाहन चालक रविंद्रकुमार कुशबराव कटरे (रा. अमेडा, ता. लांजी, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध अप.क्र. २५८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अभ्यासासाठी घराबाहेर पडलेल्या निष्पाप विद्यार्थिनीचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने गांधीटोला परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करून रस्ते सुरक्षेबाबत प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
राधाकिसन चुटे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
