अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत मंगेश धोंडीभाऊ शेंडगे याला ताब्यात घेत अशोक लेलंड टेम्पो आणि वाळूसह एकूण 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव आणि पोलीस अंमलदार गणेश लोंढे, योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल यांचे पथक अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात कारवाईसाठी रवाना झाले होते.

18 ऑगस्ट 2026 रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मंगेश शेंडगे हा अशोक लेलंड कंपनीच्या टेम्पोमधून मांडव्याकडून साकूरकडे अवैध वाळू वाहतूक करत आहे. त्यानुसार हॉटेल श्रीनाथ, मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर येथील शिवारात सापळा रचण्यात आला.

संशयित टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळली. पोलिसांनी मंगेश धोंडीभाऊ शेंडगे, वय 35 वर्षे, रा. मांडवे बु., ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 5 लाख रुपये किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा विनाक्रमांकाचा बडा दोस्त टेम्पो आणि 8 हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपीविरुद्ध घारगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 328/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *