यावल येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विकासासाठी ४०.०८ लाख रुपये खर्चाच्या विविध कामांचे भूमिपूजन लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत’ या कामांना सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांच्या सुविधांसह शाळेच्या परिसराचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे.
साने गुरुजी विद्यालयाच्या पूर्वेकडे प्रवेशद्वार उभारण्याची मागणी नागरिक, पालक आणि विद्यार्थिनींकडून करण्यात आली होती. शाळेच्या मागील बाजूच्या प्रवेशद्वारामुळे मुलींची छेडछाड होण्यासारखे प्रकार घडल्याचे सांगण्यात आले होते. या मागणीची दखल घेत नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार आता नवीन प्रवेशद्वाराच्या कामाला सुरुवात होत आहे.
यासोबतच संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करून शाळेला नवे रूप देणे, विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम उभारणे आणि लहान मुलांसाठी खेळण्यांचे साहित्य बसविणे, अशा विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या भूमिपूजन कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल भाऊ पाटील, शिक्षण सभापती पराग सराफ, नगरसेवक सागर चौधरी, नगरसेवक निसार शेख, नगरसेविका वैशालीताई बारी, समीर खान, मजहर, करीम मन्यार, निलेश बारी, बांधकाम अभियंता शेळके, मुख्याध्यापक एम. के. पाटील सर, काटकर सर, इंगळे सर, नन्नवरे सर, फेगडे सर आणि नितीन बारी यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावल शहराच्या सौंदर्यात भर घालणारी विविध विकासकामे
याच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत यावल शहरात इतर महत्त्वाची विकासकामेही हाती घेण्यात येणार आहेत. बसस्थानक परिसरात वॉटर एटीएम उभारणे, बोरावल गेट परिसरातील शिवतीर्थ येथे शेतकरी शिल्प उभारणे, फैजपूर–चोपडा रस्त्यावरील डिव्हायडरमध्ये आकर्षक शिल्प उभारणे, कलाकार कट्टा विकसित करणे, इनडोअर जिमची सुविधा उपलब्ध करून देणे आणि वृक्षारोपण करणे, अशा कामांचा यात समावेश आहे.
या विकासकामांमुळे यावल शहरातील नागरिकांना नवीन सुविधा मिळण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. शैक्षणिक सुविधांपासून सार्वजनिक ठिकाणांच्या सुशोभीकरणापर्यंत विविध कामांचे नियोजन करण्यात आले असून, शहराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
