जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी येथे राष्ट्रीय महामार्ग NH 753-BE च्या रुंदीकरणासाठी आणि भूमी अधिग्रहणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आज सकाळी भूमी अभिलेख विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संयुक्त पथकाने साकळी शिवारात जमिनीच्या मोजणीला सुरुवात केली. यावेळी बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव येथून मोजणी पथकाचे वरिष्ठ अधिकारी विनोद सूर्यवंशी आणि त्यांची टीम सकाळीच साकळी परिसरात दाखल झाली. यावेळी साकळीचे सरपंच दीपकभाऊ पाटील, शेतकरी योगेश खेवलकर, जगदीश शिवलाल पाटील, किरण माळी आणि योगेश महाजन यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून प्रत्यक्ष जमिनीची मोजणी आणि हद्द निश्चितीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार असल्याने मोजणी प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून सातबारा उतारे आणि नकाशांनुसार आपल्या जमिनीच्या हद्दी दाखवून दिल्या.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करत मोजणी प्रक्रिया शांततेत सुरू ठेवली आहे. या संयुक्त मोजणीनंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा होणार आहे.
