जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अकलूद येथे युवा क्रांती फाउंडेशन, पोलीस मित्र, ग्राहक, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेची कार्यकर्ता आढावा बैठक उत्साहात पार पडली. महिला व बालकांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासह गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
अकलूद येथील बी.सी.एम. हॉलमध्ये बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत संघटनेच्या सामाजिक कार्याचा विस्तार आणि आगामी उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष करताडसिंग राठोड यांच्या आदेशानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अशोक जोशी महाराज यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महिला व बालकांवरील अन्याय-अत्याचार, लैंगिक शोषण आणि इतर सामाजिक प्रश्नांवर पुढाकार घेऊन पीडितांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. सण, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पोलीस प्रशासनाला सहकार्य करून निःशुल्क सामाजिक सेवा देण्यावरही भर देण्यात आला.
बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. विविध तालुक्यांत संघटनेचा विस्तार, नवीन कार्यकर्त्यांची जोडणी आणि सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा झाली. पुढील महिन्यात जळगाव जिल्ह्यात भव्य जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्याचे नियोजनही करण्यात आले.
बैठकीला अशोक जोशी महाराज, आकाश तेजराव जोशी, जिल्हाध्यक्ष अशोक तायडे, जिल्हा महिला अध्यक्ष अर्चना रोटे, महिला उपाध्यक्ष पूजा राठोड, रंजना सोनवणे, मनीषा शिंदे, मिठू मुखर्जी, सागर कोळी, गोकुळ कोळी, पंकज महाजन, नितीन महाजन, सचिन चव्हाण, ईश्वर चव्हाण, अंजू पवार, संतोष जोशी, अंकुश जोशी, शेख इम्रान, संभाजी गंगावणे, समाधान निकम, पंकज खिरोडकर, सुरेश बाविस्कर, शशिकांत तायडे, राम जाधव, प्रवीण चव्हाण, हनीफ खान, ललित कपले, गणेश पाटील, रुपेश कोळी, लक्ष्मीताई मेढे आणि चंद्रकांत तायडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत तायडे यांनी केले, तर आभार लक्ष्मीताई मेढे यांनी मानले. सामाजिक न्याय, जनहित आणि गरजूंच्या मदतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प बैठकीत व्यक्त करण्यात आला.
