जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथे १७ ऑक्टोबर रोजी भव्य आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली, तर जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. शासकीय योजनांची माहिती, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शिक्षकांना नियुक्तीपत्रांचे वाटप ही या मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग, यावल यांच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पहूर येथील माळी समाज मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. तडवी-भिल्ल समाजाच्या विकास योजनांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके राहणार असून, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पसमंदा मुस्लिम समाज अभ्यास समितीचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी, जळगाव जिल्ह्यातील खासदार व आमदार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर आणि आदिवासी विकास विभाग, नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मेळाव्यात आदिवासी विकास विभागासह इतर शासकीय विभागांच्या कल्याणकारी, शैक्षणिक, आर्थिक, गृहनिर्माण आणि स्वयंरोजगार योजनांसाठी माहिती कक्ष उभारण्यात येणार आहेत. या कक्षांमध्ये नागरिकांना योजनांबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची माहिती मिळणार आहे.

याशिवाय, नाशिक विभागातील आश्रमशाळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या तीन विद्यार्थी आणि तीन विद्यार्थिनी अशा एकूण सहा गुणवंत विद्यार्थ्यांना ‘राघोजी भांगरे विद्यार्थी गुणगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने निवड झालेल्या शिक्षकांना सेवा नियुक्तीपत्रांचे वाटप केले जाणार आहे.

तडवी-भिल्ल समाजातील बांधव, महिला, युवक आणि लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांची माहिती घ्यावी आणि त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *