अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. रहेमतनगरजवळील आर. के. प्लॉटिंगच्या बाजूला काटवनात विना चारा-पाण्याशिवाय बांधून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव आणि पोलीस अंमलदार गणेश लोंढे, योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल यांचे पथक कारवाईसाठी रवाना झाले होते.
17 ऑगस्ट 2026 रोजी तपास पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली. रहेमतनगरजवळील आर. के. प्लॉटिंगच्या बाजूच्या काटवनात काही गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यावेळी कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली 11 लहान-मोठी गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी 1 लाख 70 हजार रुपये किमतीची 11 जनावरे ताब्यात घेतली. शेजारील नागरिकांकडे जनावरांच्या मालकाबाबत चौकशी केली असता उपयुक्त माहिती मिळाली नाही. मालकाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 789/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 सुधारित 2015 चे कलम 5(अ)(ब), 9 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचे कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
