‘मंथन फॉर युवा’ कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस नागपुरातील व्हीएनआयटीमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी जेन-झीचा ‘मेक इन इंडिया’मधील सहभाग, वंदे मातरम, जेन-झी आंदोलन, धर्म स्वतंत्रता कायदा आणि विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
व्हीएनआयटीमध्ये हॅकथॉन, आयडिया थॉन, एक्झिबिशन आणि स्टार्टअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी, आयडिया आणि ज्ञान लोकांसमोर येत असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. लोकउपयोगी प्रकल्पांचा समाजालाही फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
‘मेक इन इंडिया’ पूर्णत्वास जाण्यासाठी जेन-झीचा सहभाग महत्त्वाचा असून, नागपूर आणि मुंबईसह युवकांना शिक्षण आणि आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वंदे मातरमबाबत बोलताना, संविधानाचा आदर न करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. जंतर-मंतरवरील आंदोलनाची सुरुवात पेपर लीकच्या मुद्द्यावर योग्य होती; मात्र नंतर वेगवेगळे सोशल एलिमेंट सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.
धर्म स्वतंत्रता कायद्यामुळे महिला आणि मुलींना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तिरंगा केक कापण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. दिव्या देशमुखच्या बुद्धिबळातील कामगिरीचा अभिमान असल्याचे सांगत तिच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
गडचिरोलीतील घटना आणि पुण्यातील घटनेबाबतही त्यांनी दुःख व्यक्त केले. तसेच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सेवक असून, त्यांना महाराष्ट्रातच काम करू द्यावे, अशी भूमिकाही अमृता फडणवीस यांनी मांडली.
