श्रीवर्धन येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात अखेर विरेंद्र म्हात्रे यांनी सहाय्यक निबंधक म्हणून पदभार स्वीकारला आहे. नियमित अधिकारी नसल्याने रखडणाऱ्या खरेदी-विक्रीच्या दस्त नोंदणीला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

श्रीवर्धन येथील निबंधक कार्यालयात नियमित सहाय्यक निबंधक अधिकारी नसल्याने अनेकदा खरेदी-विक्रीच्या वेळी दस्तऐवजांची वेळेत नोंदणी होत नव्हती. अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना कार्यालयातून परतावे लागत होते.

यापूर्वी काकडे मॅडम यांनी सहाय्यक निबंधक म्हणून केवळ तीन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर पवार आणि इतर अधिकारी या पदावर आले. त्यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत होती. सहाय्यक निबंधकाची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली होती.

अखेर नागरिकांची मागणी शासनापर्यंत पोहोचल्यानंतर विरेंद्र म्हात्रे यांनी श्रीवर्धन सहाय्यक निबंधक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. म्हात्रे हे 2018-19 मध्ये श्रीवर्धन निबंधक कार्यालयात कार्यरत होते. 2018-19 च्या काळातील निसर्ग चक्रीवादळावेळी त्यांनी चिखलप, वाळवटी, आरावी भागातील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन सहकार्य केले होते.

श्रीवर्धन तालुका सहाय्यक निबंधक विरेंद्र म्हात्रे यांनी जास्तीत जास्त वेळ देऊन नागरिकांची सेवा करण्याचे सांगितले. आज त्यांचा कार्यालयातील पहिलाच दिवस होता. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी बुके देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते मदभाई मेमन, श्रीवर्धन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय विठ्ठल कळस आणि अफजलभाई मेमन यांनीही त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *