गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या अट्रावल गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आमदार अमोलदादा जावळे यांच्या पुढाकारातून वड्री धरणाचे पाणी इंजाळ नदीपात्रातून अट्रावल गावाच्या दिशेने सोडण्यात आले आहे.

अट्रावल गावापर्यंत वड्री धरणाचे पाणी पोहोचविण्यासाठी सुरू असलेले पाईपलाईनचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात आले. कठोरा, सांगवी, अट्रावल आणि सांगवी खुर्द या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या विहिरींची जलपातळी वाढविण्याच्या मागणीचा विचार करून आमदार अमोलदादा जावळे यांनी आमदार निधीतून अंदाजे ३५ लाख रुपये पाटबंधारे विभागाकडे वर्ग केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या निधीतून वड्री धरण ते कठोरा शिवारातील इंजाळ नदीपात्रादरम्यान पूर्वी अपूर्ण राहिलेले पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले. यासाठी ३६ इंच व्यासाचे NT-4 प्रकारचे पाईप टाकून त्यांची फिटिंग करण्यात आली. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर कठोरा येथील ग्रामस्थांनी काही किरकोळ कामे श्रमदानातून पूर्ण केली. त्यानंतर इंजाळ नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून, येत्या ८ ते १० दिवसांत हे पाणी अट्रावलपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अट्रावल गावाच्या पाणीपुरवठ्याच्या प्रमुख स्रोत असलेल्या विहिरीची तसेच शेतकऱ्यांच्या विहिरींची जलपातळी वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे. सुमारे बारा वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या अट्रावल ग्रामस्थांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण आहे. पाणी गावापर्यंत पोहोचल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल कठोरा, सांगवी, अट्रावल आणि सांगवी खुर्द परिसरातील ग्रामस्थांनी आमदार अमोलदादा जावळे यांचे आभार व्यक्त केले असून, पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *