युनिसेफचे राष्ट्रीय राजदूत आणि प्रसिद्ध अभिनेते आयुष्मान खुराणा यांनी जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली येथील स्थानिक शाळेला भेट दिली. स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या युनिसेफच्या उपक्रमाची पाहणी करत त्यांनी विद्यार्थी, नातेवाईक, ग्रामस्थ आणि ‘बालमित्रां’शी संवाद साधला.
जालना जिल्ह्यात युनिसेफच्या माध्यमातून २०१४ पासून २५८ गावांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. रोजगारासाठी पालकांचे स्थलांतर झाल्यानंतर मुलांनाही स्थलांतर करावे लागू नये, तसेच त्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि बालमनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी मुलांना आजी-आजोबा, नातेवाईक आणि गावातील विश्वासू व्यक्तींच्या देखरेखीखाली कुटुंब-आधारित पर्यायी व्यवस्थेत ठेवले जाते. युनिसेफचे प्रशिक्षित ‘बालमित्र’ मुलांच्या खेळ, अभ्यास, आहार आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतात. २०२४-२५ मध्ये पालक हंगामी कामासाठी स्थलांतरित झाल्यानंतर ५८०० हून अधिक मुले आजी-आजोबा किंवा नातेवाईकांकडे राहिली. त्यामुळे शालेय अनुपस्थिती आणि गळती कमी होण्यास, तसेच पोषण व आरोग्य सेवांचा लाभ मिळण्यास मदत झाली. २०२६ मध्ये जालना जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये ६४९ युवा स्वयंसेवक कार्यरत असून हा कार्यक्रम आणखी १९८ गावांमध्ये विस्तारित करण्यात आला आहे. आयुष्मान खुराणा यांनी कोणत्याही मुलाला परिस्थितीमुळे बालपण गमवावे लागू नये, असे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी युनिसेफ इंडिया पथकाचे उपप्रतिनिधी यास्पर मोलर, जास्मिन चौधरी आणि सरपंच शंकर आसाराम आदी उपस्थित होते. खुराणा आणि यास्पर मोलर यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली.
