• शेवगाव-पैठण रोडवर लाकडाने भरलेला ४०७ पकडला
  • तळणीच्या माथ्यावर वनकर्मचाऱ्यांची कारवाई
  • पकडलेल्या वाहनाला नंबर प्लेट नसल्याची माहिती
  • कारवाईनंतर वाहन कुठे गेले, प्रश्न कायम
  • पंचनामा आणि दंडाची अधिकृत माहिती अस्पष्ट
  • आर्थिक तडजोडीच्या चर्चेने वनविभागावर प्रश्नचिन्ह

AHILYANAGAR | शेवगाव-पैठण रोडवरील तळणीच्या माथ्यावर लाकडाने भरलेले ४०७ वाहन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वाहन पकडल्यानंतर त्यावर नेमकी काय कारवाई झाली आणि सध्या हे वाहन कुठे आहे, याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी लाकडाने भरलेले ४०७ वाहन पकडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या वाहनाला नंबर प्लेट नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या कारवाईवेळी वनरक्षक, पैठण तसेच जायकवाडी पक्षी अभयारण्यातील वनकर्मचारी उपस्थित होते. संबंधित पथकाच्या वाहनाचा क्रमांक MH 47 E 1626 असल्याची माहिती आहे.

पैठण हद्दीतील वनकर्मचाऱ्यांनी शेवगाव हद्दीत येऊन लाकूड वाहतूक करणारे वाहन पकडल्याने नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे. मात्र, पकडलेले ४०७ वाहन पुढे कुठे नेण्यात आले? लाकडाची तपासणी आणि पंचनामा झाला का? वाहनावर गुन्हा किंवा दंडाची कारवाई झाली का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

शेवगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, “पैठण हद्दीतील अधिकाऱ्यांनी कारवाई केली असेल,” अशी माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कारवाई कोणत्या विभागाने केली, वाहन कुठे जमा केले आणि वाहनचालक अथवा मालकाविरुद्ध काय कारवाई झाली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, वाहनावर नियमानुसार कारवाई झाली की ते सोडून देण्यात आले, तसेच कारवाई न होण्यामागे काही आर्थिक तडजोड झाली का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

पकडलेल्या वाहनावर कारवाई झाली असल्यास पंचनामा, गुन्हा, दंड किंवा जप्तीची अधिकृत माहिती वनविभागाने जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहन सोडण्यात आले असल्यास ते कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या कारणामुळे सोडण्यात आले, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणीही होत आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | शेवगाव, अहिल्यानगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *