यावल शहरात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मोत्सवानिमित्त ईद मिलादुन्नबीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांतून हजारो मुस्लिम बांधवांनी सहभागी होत भव्य जुलूस मिरवणूक काढली.
ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनातील शिकवण, विचार आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या कार्यक्रमातून ठेवण्यात आला.
पैगंबर हजरत मोहम्मद यांनी जगाला शांतता, मानवता, प्रेम, दयाळूपणा, बंधुभाव आणि समानतेचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीचे स्मरण करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने जुलूस मिरवणुकीत सहभाग घेतला.
दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक सैय्यद मोईनोद्दीन, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त बजावला.
