ना महागडे स्पोर्ट्स शूज, ना ट्रॅकसूट, ना प्रशिक्षकाचे मार्गदर्शन… मात्र हातात रोजच्या कष्टाची ताकद आणि मनात दोन लेकींच्या उज्ज्वल भविष्याची जिद्द घेऊन ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी साडी नेसून अनवाणी धावत मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

हिंगोली येथून मुलींच्या शिक्षणासाठी अंबाजोगाईत आलेल्या रमाबाई रणवीर या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वयंपाकाचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलींना शिकवून मोठे करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली.

अंबाजोगाई येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानबाबा चौकदरम्यान अमृत दौड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

रमाबाई साध्या साडीत स्पर्धेत सहभागी झाल्या. सुरुवातीला तरुण-तरुणी वेगाने पुढे गेले. मात्र काही अंतरानंतर त्यांच्या पायातील स्लीपर निसटू लागल्याने त्यांनी ती हातात घेतली आणि अनवाणी धावायला सुरुवात केली.

पावसाने गार झालेला रस्ता, पायाला टोचणारे खडे आणि साडीचा पदर सांभाळत रमाबाई धावत राहिल्या. एकामागून एक ट्रॅकसूटमधील स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी फिनिशिंग लाईनवर प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना तीन हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.

बक्षीस स्वीकारल्यानंतर रमाबाई म्हणाल्या, ‘पोरांच्या संसारासाठी रोज धावपळ करते… आज स्वतःसाठी धावले.’

दोन मुलींच्या शिक्षणासाठी हिंगोली सोडून अंबाजोगाईत आलेल्या या आईने केवळ मॅरेथॉन जिंकली नाही, तर जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर परिस्थितीवरही मात करता येते, हे सिद्ध केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *