डोंबिवलीत मनसेने भाजपला राजकीय धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या असंख्य महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा मनसेत घरवापसी केली आहे. मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजू पाटील यांनी २०२४च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानावर गंभीर आरोप केला. ‘२०२४ मध्ये बोगस मतदान झालं, हे आम्हाला सर्व समजत होतं; मात्र त्यावेळी काही करता आलं नाही,’ असा दावा त्यांनी केला.
तसेच आगामी काळात SIRच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी ‘अडीच वर्षांनंतर मी पुन्हा आमदार होणार,’ असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केल्याने डोंबिवलीच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
